अकृषिक करासाठी महसूल विभाग ॲक्शन मोडवर; लातूरच्या १४ हजार ४७७ जणांना नोटिसा

By आशपाक पठाण | Published: December 5, 2023 07:24 PM2023-12-05T19:24:20+5:302023-12-05T19:25:04+5:30

जिल्हा प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून कर वसुलीचे काम मनपाच्या माध्यमातून केले जात होते.

Revenue Department on Action Mode for Non-Agricultural Tax; Notices to 14 thousand 477 people of Latur | अकृषिक करासाठी महसूल विभाग ॲक्शन मोडवर; लातूरच्या १४ हजार ४७७ जणांना नोटिसा

अकृषिक करासाठी महसूल विभाग ॲक्शन मोडवर; लातूरच्या १४ हजार ४७७ जणांना नोटिसा

लातूर : महापालिका हद्दीत असलेल्या १४ हजार ४७७ वाणिज्यिक आस्थापनांना अकृषिक कर वसुलीसाठी महसूल विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडे मागील तीन वर्षांचे जवळपास १९ कोटी रुपये थकीत आहेत. वसुलीसाठी सहा पथके नेमण्यात आली असून, दोन दिवसांत या पथकाने जवळपास ३५ लाख रुपयांची वसुली केली आहे.

वाणिज्य आस्थापनांना दरवर्षी अकृषिक कराचा भरणा करावा लागतो. जिल्हा प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून कर वसुलीचे काम मनपाच्या माध्यमातून केले जात होते. मालमत्ता करासोबत अकृषिक कराची नोटीस मनपाकडून मालमत्ताधारकांना दिली जात होती. याला नागरिकांकडून विरोध झाला होता. तरीदेखील महापालिकेने तशाच नोटीस दिल्या. पण, महापालिकेला मालमत्ता करच व्यवस्थित वसूल झाला नाही. त्यात पुन्हा अकृषी कराची भर पडली. परिणामी, त्यांच्या वसुलीवरही परिणाम झाला. महसूल विभागाला मनपाकडून अपेक्षित कर वसुली झाली नाही. त्यामुळे महसूल विभागाने यावर्षीपासून वसुलीचे काम हाती घेतले आहे.

वसुलीसाठी नेमली सहा पथके...
लातूर शहरातील वाणिज्यिक असलेल्या १४ हजार ४७७ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून मागील तीन वर्षांच्या कराची वसुली केली जाणार आहे. तलाठी एस. व्ही. सागावे, कन्हेरी सजाचे डी. आर. शिंदे, आर्वीचे तलाठी जी. पी. डोईजोडे, व्ही. एस. कतलाकुटे, खाडगावचे तलाठी एस. डी. तावशीकर, महाराणा प्रतापनगरचे डी. एन. कव्हे, मुरूड सजाचे आर. एस. पानगावकर हे पथकाचे प्रमुख आहेत. प्रत्येक पथकात पाच ते सहा कर्मचारी आहेत. तसेच सहा मंडळ अधिकारी पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

१९ कोटीची थकबाकीची वसुली होणार...
मागील तीन वर्षांपासून वाणिज्यिक आस्थापनांकडे जवळपास १९ कोटी रुपये थकीत आहेत. महसूलच्या पथकाकडून ही वसुली केली जाणार आहे. दोन दिवसांपासून वसुली सुरू झाली आहे. दरवर्षी ६ कोटी ५२ लाख रुपये कर वसुली अपेक्षित आहे. महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या विविध आस्थापनांकडून दरवर्षी २ कोटी २५ लाख रुपये कर अपेक्षित आहे. यंदा मनपालाही हा कर वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

सात दिवसांत कराचा भरणा करा...
वाणिज्यिक आस्थापनांनी कर वसुलीची नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत थकीत कराचा भरणा करणे अपेक्षित आहे. महसूल विभागाने सर्वांनाच नोटिसा दिल्या आहेत. दोन दिवसांत जवळपास ३५ लाख रुपये वसूल झाले आहेत. आस्थापनांनी आपल्याकडील थकीत कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

Web Title: Revenue Department on Action Mode for Non-Agricultural Tax; Notices to 14 thousand 477 people of Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.