उदगीरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला नवसंजीवनी; दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात !
By संदीप शिंदे | Published: May 22, 2023 06:32 PM2023-05-22T18:32:55+5:302023-05-22T18:33:17+5:30
मराठी साम्राज्याला उर्जित अवस्था प्राप्त करून देणाऱ्या उदगीरच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाल्यामुळे उदगीरचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे.
उदगीर : येथील भुईकोट किल्ला भुईसपाट होण्याच्या मार्गावर असतानाच राज्याच्या पर्यटन सांस्कृतिक विभागाने या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीसाठी ४कोटी ८८ लाख ४४ हजार ५५८ रुपयांचा निधी मंजूर केला होता. या कामाची निविदा पुरातत्व विभागाने काढून ठेकेदारामार्फत हे काम गतीने सुरू आहे. येत्या कांही दिवसातच हा किल्ल्याचा कायापालट होणार असून, नवसंजीवनी मिळणार आहे.
पुणे येथील तेजस्विनी आफळे या वास्तूविशारदाकडून या किल्ल्याच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करून घेण्यात आले होते. ढासळत चाललेला ऐतिहासिक किल्ला जतन करण्याची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. युती शासनाच्या व तत्कालीन आमदार स्व. चंद्रशेखर भोसले यांच्या कार्यकाळात या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी व डागडुजीसाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र कागदोपत्री कामे दाखवून करोडो रुपयांचा चुराडा या विभागाने केला होता. त्यामुळे या किल्ल्याची दुरवस्था कायम होती. भुईकोट किल्ला भुईसपाट होण्याच्या मार्गावर असतानाच तत्कालीन राज्यमंत्री व उदगीरचे आ. संजय बनसोडे यांनी या किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीसाठी ४ कोटी ८८ लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता.
उदगीरचे नाव अजरामर...
मराठी साम्राज्याला उर्जित अवस्था प्राप्त करून देणाऱ्या उदगीरच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाल्यामुळे उदगीरचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. १७६० मध्ये मराठे व निजाम यांच्यात लढाई होवून यात मराठ्यांचा विजय झाला होता. या विजयानंतर पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा संबंध या किल्ल्याशी आहे. त्यामुळे उदगीरच्या किल्ल्याची राज्यात नव्हे, तर भारताच्या इतिहासात गणना झालेली आहे. या किल्ल्यात जाज्वल्य देवस्थान व ज्यांच्या नावावरून या शहराचे नाव उदगीर हे नामकरण झाले .अशा उदागीरबाबांची संजीवन समाधी या किल्ल्यात आहे.
देशातले पहिले ध्वजारोहण...
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे व १७ सप्टेंबर रोजी तहसीलदारांच्या हस्ते सर्वात अगोदर पहाटे ५ वाजता या किल्ल्यावर ध्वजारोहण फडकण्याची परंपरा कायम सुरू आहे. माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर करून घेतल्यानंतर पुरातत्व विभागाकडून किल्ला दुरुस्तीची कामे सुरू आहेत. किल्ल्याच्या डागडुजी व दुरूस्तीमुळे या किल्ल्याला नवसंजीवनी मिळणार आहे.