संधिवातीचा विळखा वाढतोय; महिलांमध्ये प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 07:14 PM2018-10-12T19:14:11+5:302018-10-12T19:19:28+5:30

यावर नियंत्रणासाठी सकस आहार आणि व्यायाम आवश्यक असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे़ 

Rheumatoid arthritis is growing; More in women | संधिवातीचा विळखा वाढतोय; महिलांमध्ये प्रमाण अधिक

संधिवातीचा विळखा वाढतोय; महिलांमध्ये प्रमाण अधिक

googlenewsNext
ठळक मुद्देआहारात प्रोटिनची कमतरता भासत असल्याने जवळपास १५ ते २० टक्के लोकांना संधी वातीचा त्रास आहे़ संधिवातीचे अनेक प्रकार आहेत़ ती कोणत्याही वयात होऊ शकते़

- आशपाक पठाण  

लातूर : आहारात कार्बोहायड्रेटचे अधिक प्रमाण , खाली बसून जेवणाची पध्दत, व्यायामाचा अभाव आदी कारणामुळे संधिवातीचा त्रास लवकर सुरू होतो़ आहारात प्रोटिनची कमतरता भासत असल्याने जवळपास १५ ते २० टक्के लोकांना संधी वातीचा त्रास आहे़ यावर नियंत्रणासाठी सकस आहार आणि व्यायाम आवश्यक असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे़ 

१२ आॅक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिवस म्हणून साजरा केला जातो़ भारतात रक्तातील वातीचे प्रमाण १३ ते २० टक्के आहे तर वयोमानानुसार होणा-या वातीचे प्रमाण जवळपास ५० टक्के आहे़ हा आजार बरा होत नाही, अशा अनेक गैरसमजुती आहेत़ परंतु अद्ययावत उपचार पध्दती व नवनवीन औषधींचा शोध लागल्याने याला आळा घालता येणे शक्य आहे़

औषधी महागडी असली तरी रूग्णांना दिलासा मिळतो़ संधिवातीचे अनेक प्रकार आहेत़ ती कोणत्याही वयात होऊ शकते़ याचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक असून अनेक रूग्णांमध्ये संधिवातीचे ठोस कारणही सापडत नाही़ काहींना हा आजार अनुवंशिक किंवा जनुकीय बदलामुळे होत असल्याचे समोर आले आहे़ विशिष्ट जंतूसंसर्ग किंवा विषाणूमुळे संधिवात होते़ धुम्रपान, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव यातून आजाराला बळ मिळत आहे, असे संधिवात तज्ज्ञ डॉ़ सूरज धूत, डॉ़ अशोक पोदार यांनी सांगितले़  

योग्य वेळी उपचार आवश्यक़़
नेहमी सांधे किंवा मांसपेशी दुखणे, सांधे आकडे, सूज येणे, शरीरावर वारंवार पुरळ येणे, वारंवार गर्भपात, थकवा जाणवणे, त्वचा जड पडणे, थंडीमुळे सांधे दुखणे, त्वचा कोरडी पडणे आदी लक्षणे ही संधिवातीची आहेत़ त्यामुळे रूग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घेणे आवश्यक आहे़ संधिवातीवर उपचार करण्यासाठी संशोधन करून औषधी निर्माण करण्यात येत आहे़ या औषधांमुळे रूग्णांना दिलासा मिळतो, असे डॉ़ सूरज धूत यांनी सांगितले़ 

थंडीपासून बचाव महत्वाचा़ 
वातीचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे़ उपचारात नवीन तंत्रज्ञान आले आहे़ औषधी महागडी असून यातून रूग्णांना लवकर दिलासा मिळतो़ वातावरणातील बदलाचा परिणाम संधिवातीच्या रूग्णांवर होतो़ हिवाळ्यात अशा रूग्णांना जास्त त्रास होतो़ त्यामुळे रूग्णांनी बचावासाठी उबदार कपडे परिधान करावेत़ नवीन तंत्रज्ञानामुळे रोगनिदान सोपे झाले आहे़ रूग्णांनी योग्य वेळी उपचार घेणे महत्वाचे आहे, असे डॉ़ अशोक पोदार यांनी सांगितले़

Web Title: Rheumatoid arthritis is growing; More in women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.