देवणी तालुक्यात पावसाची रिमझिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:33+5:302021-07-23T04:13:33+5:30
मराठवाडा संपर्कपदी शिवप्रसाद मुरके देवणी : येथील शिवप्रसाद विश्वेश्वर मुरके यांची भारतीय परिवर्तन क्रांती पार्टीच्या मराठवाडा संपर्क प्रमुख पदी ...
मराठवाडा संपर्कपदी शिवप्रसाद मुरके
देवणी : येथील शिवप्रसाद विश्वेश्वर मुरके यांची भारतीय परिवर्तन क्रांती पार्टीच्या मराठवाडा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय परिवर्तन क्रांती पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माधव नागोराव भंडारे नागराळकर यांनी ही निवड केली आहे. या निवडीबद्दल शिवप्रसाद मुरके यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
धनेगाव बॅरेजचे पाणी कमी करा
वलांडी : धनेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रातील धनेगाव हेळंब रस्त्यावरील पुलाचे उर्वरीत काम तात्काळ करावे. कामाला बाधा ठरत असलेल्या पाण्याची पातळी कमी करण्याची मागणी धनेगाव व हेळंब ग्रामपंचायतसह शेतक-यांनी गुरुवारी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
धनेगाव बॅरेजमध्ये पुर्णक्षमतेने पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे पाण्याच्या पलिकडे असलेली शेती शेतकऱ्यांना कसणे जिकरीचे झाले आहे. यासाठी धनेगावकरांना १० किमीचा पल्ला पार करावा लागतो. हेळंब धनेगाव दळणवळणही बंद होणार आहे. यासाठी पाणीपातळी कमी केल्यास उर्वरीत पुलाचे काम पुर्ण होवु शकते, असे, हेळंबचे सरपंच गोरख सावंत यांनी सांगितले.
जळकोट ग्रामीण रुग्णालयात वृक्षारोपण कार्यक्रम
जळकोट : येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, डॉ. बिराजदार, शेवाळे व अन्य कर्मचाऱ्यांनी २५० वृक्षांची लागवड केली. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज आहे. नागरिकांनी आपापल्या घरात निदान दहा झाडे लावावीत. आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात मियावाकी झाडे लावावी, त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल, असे आवाहन अधीक्षक डॉ.जगदीश सूर्यवंशी यांनी केले. यावेळी डॉ. संजय पवार, डॉ. बिरादार, डॉ. सचिन सिद्धेश्वरी, शेवाळे, भोगे, रूपाली बलांडे, माधव डांगे, नदीम शेख आदींची उपस्थिती होती.
आषाढीनिमित्त वाघोली येथे प्रवचन
वडवळ ना. : भक्तीच्या मार्गाने मनुष्याचा उद्धार करण्यासाठी संत जन्माला आले. संताचे कार्य हे मानवाच्या कल्याणासाठीच आहे, असे प्रतिपादन प्रा. मारोती बुद्रुक पाटील यांनी येथे केले. वाघोली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावकरी बांधवांच्या वतीने प्रवचन सोहळा व किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी प्रवचनातून संताच्या कार्याची महती व विठ्ठलाची महिमा याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील भाविकांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागात एसटी सुरु करावी
अहमदपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असून, सर्व व्यवहार पुर्वपदावर आले आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने शहरी भागासाठी एसटी बसेस सुरु केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही बसेस सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाश्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने ग्रामीण भागासाठी बसेस सुरु करण्याची मागणी अहमदपुर तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे.
रिमझिम पावसामुळे पिकांवर किडीचा प्रादूर्भाव
लातूर : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाच्या सरी सुरु आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिके बहरली असून, काही ठिकाणी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पिकांवर फवारणी करणे गरजेचे बनले असून, कृषि विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पिक असून जवळपास ४ लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.