लातूरमध्ये रस्ते अपघातात वर्षभरात २९० जणांचा झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 08:12 PM2020-01-13T20:12:19+5:302020-01-13T20:13:55+5:30
लातूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा दंडाच्या उद्दीष्ट पूर्तीची अधिक काळजी असल्याची चर्चा आहे़
- आशपाक पठाण
लातूर : रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे़ २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अपघात वाढले असून, एकूण ६४१ अपघातात २९० जणांचा मृत्यू झाला आहे़ लातूर जिल्ह्यात सर्वाधिक अपघात अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीत झाले असून, मृतांमध्ये २१ ते ३० वर्षे वयोगटातील तरूणांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे़
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक वाहतूक लातूर-नांदेड, लातूर-बार्शी, लातूर - अंबाजोगाई, लातूर-तुळजापूर या मार्गावर असून, रस्ते अपघाताचे प्रमाणही याच मार्गावर जास्त असल्याचे आढळून आले आहे़ २०१८ मध्ये जिल्ह्यात एकूण २३३ अपघात झाले होते़ त्यात २४६ जणांचा मृत्यू झाला होता़ दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतुकीची साधणे, चांगले रस्ते होत असले तरी अपघाताची संख्या मात्र तुलनेने घटण्यापेक्षा वाढली आहे़ २०१९ मध्ये वर्षभरात ६४१ अपघात झाले आहेत़ यात २९० जणांचा मृत्यू झाला आहे़ अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या प्रमुख मार्गांवर अपघात व मृतांचीही संख्या अधिक आहे़ अहमदपूर ते चाकूर, माळेगाव, किनगाव तसेच शहरानजिक अपघात वाढले आहेत़
लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याहद्दीत वर्षभरात २६, रेणापूर हद्दीत २६ व औसा पोलीस ठाणे हद्दीत २२ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे़ शहरातील रिंगरोडवर अपघाताचे प्रमाण वाढत आहे़ दरम्यान, मागील दोन वर्षात रस्ते अपघातात तब्बल ५३६ जणांचा मृत्यू झाला आहे़ वाहतूक नियमांकडे होत असलेले दुर्लक्ष, मद्यपान करून वाहन चालविणे, वेग नियंत्रणात नसणे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची माहिती, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी दिली़
उद्दीष्ट पूर्तीसाठी वाहतूक शाखेची धडपड
वाहतूक सुरळीत करण्याचे काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांची नजर ही वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा ‘दंड’ आकारण्यातच अधिक असल्याने जिल्ह्यात वाहतूक शिस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे़ लातूर शहरातही वाहतूक शाखेचे पोलीस वर्दळीच्या ठिकाणी उभे असतात़ मात्र वाहतूक कोंडी झाल्यावर ती सुरळीत करण्यापेक्षा दुचाकी किंवा तीनचाकी वाहने लक्ष करीत रस्त्यात मध्यभागी धावत येऊन गर्दीतून वाहने बाजुला काढतात़ यात एखाद्याकडे सर्वच कागदपत्रे आढळून आली तरी शेवटी पीयूसी किंवा कागदपत्रांची सत्य प्रत सोबत नसल्याचे कारण पुढे करीत अडवणूक केली जाते़ अनेकदा वाहतूक पोलीस पुढे येत असल्याचे पाहून दुचाकीचालक भरधाव जातात़ यातून अपघाताच्या घटनाही होतात़ शिवाय, महामार्ग पोलीसही दररोज औसा रोडवर एकाच ठिकाणी वाहन तपासणीत गुंतलेले असतात़ दरम्यान, लातूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा दंडाच्या उद्दीष्ट पूर्तीची अधिक काळजी असल्याची चर्चा आहे़
अपघाती मृत्यूत दुचाकीचालकांचे प्रमाण अधिक
२०१९ मध्ये वर्षभरात झालेल्या एकूण अपघातात २९० जणांचा मृत्यू झाला असून, यात दुचाकीवर १८३, पादचारी ५७, चारचाकी ६१, ट्रक ५१, बसेस २२, ट्रॅक्टर १८ व इतर वाहनांच्या अपघातात १९ जणांचा मृत्यू आहे़