रस्ते, इमारतीची मंजूर कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:20 AM2021-01-25T04:20:03+5:302021-01-25T04:20:03+5:30
मतदारसंघातील विविध कामांचा आढावा लातुरात राज्यमंत्री बनसोडे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ...
मतदारसंघातील विविध कामांचा आढावा लातुरात राज्यमंत्री बनसोडे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २चे कार्यकारी अभियंता मधुसूदन कांडलीकर, उपविभागीय अभियंता लक्ष्मण देवकर, उपअभियंता पी. आर. किटे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, उदगीर वळण रस्त्यावर मलकापूर गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या मुख्य अभियंत्यांची सर्वसाधारण मांडणी नकाशा मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार सुमारे ३५ कोटींच्या कामाचे अंदाजपत्रक बनविणे व तत्काळ निविदा कार्यवाही करून कामास सुरुवात करण्याच्या सूचना केल्या. तसेच गतवर्षीच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळालेल्या उदगीर तालुक्यातील राज्यमार्गावरील ३ कामांचे व जळकोटातील राज्यमार्गाच्या एका कामाचे आणि प्रमुख जिल्हा मार्गावरील उदगीर तालुक्यातील ५ कामांचे, जळकोट तालुक्यातील एका कामाचे असे एकत्रित १० कामांची (अंदाजित रक्कम ४६ कोटी) निविदा कार्यवाही करून कामास सुरुवात करावी.
विशेष दुरुस्तीअंतर्गत राज्यमार्ग २४९ उमा चौक ते लोणी या भागातील रस्त्याची सुधारणा करण्याकरिता मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून २० कोटी रकमेस मंजुरी मिळवून घेतली आहे. त्यानुसार या भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण, नाली व रस्ता दुभाजकासह शहरातील या मुख्य रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करून त्याची निविदा काढून तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. मागील अर्थसंकल्पात विशेष प्रयत्न करून मंजूर करण्यात आलेल्या उदगीरातील प्रशासकीय इमारत, जळकोटात प्रशासकीय इमारत, उदगीरात शासकीय विश्रामगृह, जळकोटात शासकीय विश्रामगृह ही कामे निविदा प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ सुरू करण्याच्या सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी उस्मानाबाद सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंत्यास दिल्या. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी वरीलपैकी जळकोटातील प्रशासकीय इमारत, उदगीरातील शासकीय विश्रामगृह कामांची निविदा प्रसिध्दीसाठी सादर केल्याचे नमूद केले. उदगीरातील प्रशासकीय इमारत आणि जळकोटातील शासकीय विश्रामगृह कामांची निविदा कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता कांडलीकर यांनी सांगितले. उदगीर पालिकेअंतर्गतच्या ठोक तरतुदीनुसार मंजुरी मिळालेले बौध्द विहार बांधकाम, शादीखाना बांधकाम, लिंगायत भवन, तसेच ट्रामा केअर इमारतीच्या उर्वरित बांधकामाची निविदा प्रसिध्दीस सादर केल्याची माहिती कांडलीकर यांनी दिली.