बिहार राज्यातील दराेडेखाेरांचा महाराष्ट्र, कर्नाटकातील बॅंक, फायनान्सवर डाेळा !
By राजकुमार जोंधळे | Published: September 29, 2023 09:15 PM2023-09-29T21:15:40+5:302023-09-29T21:16:43+5:30
रेकीनंतर सीमाभागात दराेडा टाकण्याचा रचला जाताे ‘प्लॅन’
लातूर : बिहारमधील दराेडेखाेरांच्या टाेळीचा म्हाेरक्या तुरुंगात असून, ताे महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाभागात माेठे दराेडे टाकण्याचा ‘प्लॅन’ रचताे. त्याची टाेळी हा प्लॅन यशस्वी करते. या प्लॅननुसार लातूरसह कर्नाटकातील आळंद भागात रेकी करण्यात आली. गणेशाेत्सवाच्या धामधुमीत असलेल्या पाेलिसांची नजर चुकवत माेठा दराेडा टाकायचा... असे नियाेजन झाले हाेते. मात्र, पाेलिसांनी गुरुवारी त्यांचा हा ‘प्लॅन’ उधळून लावला आहे.
बिहारमधील कुख्यात दराेडेखाेरांच्या टाेळीचा महाराष्ट्र-कर्नाटकातील बॅंक, सराफा दुकान, फायनान्स कार्यालयावर डाेळा असल्याचे समाेर आले. टाेळीचा देशात विविध राज्यांच्या सीमाभागात वावर असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली, असे पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे म्हणाले. दाेघांच्या अटकेनंतर चार पिस्टल, एक गावठी कट्टा, ५९ जिवंत काडतुसे, दुचाकी, बनावट आधार कार्ड असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. व्यंकटेश आलेवार, खुर्रम काझी, राहुल सोनकांबळे, यशपाल कांबळे, योगेश गायकवाड, संपत फड, मनोज खोसे, प्रदीप चोपणे, रामहरी भोसले यांच्या पथकाने केली.
खबऱ्याने दिली टीप अन् पाेलिसांनी उधळला डाव...
सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांना खबऱ्याने टीप दिली. लातूर जिल्ह्यात पोलिस गणेश उत्सव, विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तामध्ये व्यस्त असतात. याच काळात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत अट्टल गुन्हेगार आहेत. लातूर-मुरुड रोडवर दरोड्याच्या तयारीतील पाच जणांवर छापा मारला. पाचपैकी दोघांना पकडले. तिघे जागेवरच दोन बॅग टाकून पळाले. खबऱ्याच्या टीपनंतर पाेलिसांनी दराेडेखाेरांचा डाव उधळला.
लातुरात टाेळीतील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल...
टाेळीतील विकासकुमार पिता श्रीगोपाल शरण गुप्ता (२७, रा. तिउरी ठाणा, मानपूर, जि. नालंदा, बिहार), अमितकुमार रवींद्रसिंग यादव (२२ रा. फतवा, जि. पाटणा, बिहार) यांना अटक केली. तर शिवकुमार उर्फ संजीव कुमार यादव (३० रा. हाजीपुरा, जि. वैशाली, बिहार), लकीकुमार राजकुमार प्रधान (२८, रा. पश्चिम सारंगपूर), छोटू उर्फ ननकी यादव, (२९, रा. वैशाली, बिहार) हे फरार झाले. दिलीपकुमार (३५), सुबोधसिंग (४०, रा. चंडी, जि. नालंदा, बिहार) यांचा समावेश आहे. याबाबत एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाटणातील कारागृहातील सुबाेधसिंगशी टाेळीचा संपर्क...
महाराष्ट्र- कर्नाटकात दराेडा टाकण्यासाठी आलेले टाेळीतील गुन्हेगार पाटणा कारागृहात असलेला गुन्हेगार सुबोधसिंग (रा. चंडी, जि. नालंदा, बिहार) याच्या संपर्कात आहेत. टाेळीने कर्नाटकातील आळंद, लातुरातील एखाद्या बँकेवर, सराफ दुकानावर, फायनान्सवर दरोडा टाकण्याचा कट रचला. त्यानुसार दरोडा टाकण्यासाठी बिहारमधून आल्याची कबुली दिली.