कोळनुरात एकाच रात्रीत सहा घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास
By हरी मोकाशे | Published: August 23, 2022 06:11 PM2022-08-23T18:11:23+5:302022-08-23T18:11:34+5:30
या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोळनूर (जि. लातूर) : जळकोट तालुक्याती कोळनूर येथे काही महिन्यांपासून घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, सोमवारी रात्री ते पहाटेच्या वेळेपर्यंत गावातील सहा घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून लाखाचा ऐवज पळविला. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोळनूर येथील रमेश चोले, गरुड डिगोळे, उमाकांत काळे, जीवन पांचाळ, शिवाजी चोले, व्यंकट चोले या पाच जणांची घरे अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेच्या सुमारापर्यंत फोडली आहेत. यात रमेश चोले यांच्या घरातील २० हजार रुपये, डिगोळे यांच्या घरातील दीड तोळ्याचे सोन्याचे नेकलेस अज्ञात चोरट्यांनी पळविले. तसेच अन्य चार घरे फोडून घरातील वस्तूंची नासधूस केली. या घटनेमुळे नागरिकांत भीती पसरली आहे. याप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गावात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.