अहमदपुरातील शंभर वर्षांपूर्वीच्या जिल्हा परिषद शाळेचे छत कमकुवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:21 AM2021-02-24T04:21:17+5:302021-02-24T04:21:17+5:30
अहमदपूर : येथील शंभर वर्षांपूर्वीच्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे छत कमकुवत झाले आहे. परिणामी, पावसाळ्यात गळती लागते. त्यामुळे सदरील ...
अहमदपूर : येथील शंभर वर्षांपूर्वीच्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे छत कमकुवत झाले आहे. परिणामी, पावसाळ्यात गळती लागते. त्यामुळे सदरील इमारत पाडून नवीन वर्ग खोल्या बांधण्याची मागणी मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषदेकडे केली. दरम्यान, बांधकाम विभागाने सदर इमारत मजबूत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत १९२१मध्ये बांधण्यात असून, आता शंभर वर्षे झाली आहेत. ही इमारत तालुक्याच्या वैभवात भर घालणारी आहे. या शाळेतून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. १९४८पासूनचे सर्व रेकॉर्ड या ठिकाणी उपलब्ध आहे. सन १९७० ते ७२ च्या कालावधीत या शाळेमध्ये दहावीच्या चार तुकड्या होत्या. तसेच ६५ शिक्षक कार्यरत होते. मात्र, कालांतराने विद्यार्थी संख्या कमी झाली आणि शिक्षकही कमी झाले.
तालुक्यात पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असलेली ही एकमेव शाळा आहे. शाळेत ९ वर्ग खोल्या असून, ७ एकर एक गुंठा एवढे खेळाचे मैदान आहे. वसतिगृह, सेवकखोली, प्रयोगशाळाही आहे. मात्र, इमारत जुनी झाल्यामुळे सातत्याने डागडुजी करावी लागते. आज बऱ्याच ठिकाणी पडझड झाली असून पावसाळ्यात गळती लागते. खिडक्याही मोडल्या आहेत. त्यामुळे सन २००९, २०१२, २०१७, २०१९ मध्ये इमारतीची डागडुजी करण्यात आली. मात्र, छताची गळती कायम आहे. तसेच दारे, खिडक्यांचीही दुरवस्था झाली आहे. सततच्या खर्चामुळे शिक्षण विभागाने ही जुनी इमारत पाडून तिथे नवी इमारत उभी करून दहा वर्ग खोल्या उपलब्ध कराव्यात, असे पत्र बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना दिले. त्यामुळे बांधकाम विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी झाली. भिंती पूर्णत: चांगल्या आहेत. छतास गळती असल्याने छताचे काम करणे गरजेचे असल्याचा अहवाल त्यांनी दिला. तसेच बाजूने पिल्लर उभे केल्यास इमारत चांगली उभी राहू शकते, असेही अहवालात स्पष्ट केले.
दरम्यान, सदर इमारत पाडू नये. शाळेतून वकील, डॉक्टर, अधिकारी निर्माण झाले आहेत. त्यामुळे सदर इमारत न पडता त्याचे जतन करावे. सदर इमारतीची चांगल्या पद्धतीने डागडुजी करावी, अशी मागणी माजी विद्यार्थी संघटनेने केली आहे.
दुरुस्ती करुनही गळती कायम...
या इमारतीस शंभर वर्षे झाली आहेत. इमारतीचे छत पूर्णत: गळत आहे. दारे, खिडक्या तसेच पत्रे कुजले आहेत. वारंवार डागडुजी करुनही सुधारणा होत नसल्याने या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी संबंधितांस पत्र व्यवहार केल्याचे प्रभारी मुख्याध्यापक बी. के. हाश्मी यांनी सांगितले.
इमारतीस कॉलम उभे करण्याची गरज...
छतास गळती असल्याने तेवढे काम करणे गरजेचे आहे. मात्र, भिंती मजबूत आहेत. इमारतीसाठी बाहेरून कॉलम उभे केल्यास ही इमारत आणखीन काही वर्ष टिकू शकते. शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार आणि निधी उपलब्धतेनुसार काम करावे लागेल, असे बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. आर. सावंत यांनी सांगितले.
ऐतिहासिक इमारत जतन करा...
इमारत जुनी झाली म्हणून पाडणे हा पर्याय नाही. त्यासाठी बांधकाम विभागाच्या सूचना लक्षात घेऊन त्याचे जतन करावे. कारण आमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी आहेत. ही ऐतिहासिक वास्तू होऊ शकते, असे माजी विद्यार्थी डॉ. अशोक सांगवीकर, विरेंद्र रेड्डी, सांब महाजन, सत्यनारायण काळे, शिवानंद हिंगणे, मोहंम्मद ईलाही, विलास वतनी, गंगाधर हरणे, शंकर भालके, मोहसीन बाईजिद, दयासागर शेटे, हमीद हुसेन हानिफी यांनी सांगितले.