आरटीओचा दणका! ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ८४१ वाहनधारकांना २ कोटी ३७ लाखांचा दंड

By आशपाक पठाण | Published: May 28, 2024 07:29 PM2024-05-28T19:29:52+5:302024-05-28T19:30:25+5:30

एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत लातूरच्या परिवहन विभागाने राबविलेल्या वाहन तपासणीत २ हजार ८८० अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली.

RTO bang! 2 crore 37 lakhs fined to 841 vehicle owners for transporting overload | आरटीओचा दणका! ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ८४१ वाहनधारकांना २ कोटी ३७ लाखांचा दंड

आरटीओचा दणका! ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ८४१ वाहनधारकांना २ कोटी ३७ लाखांचा दंड

लातूर : मालवाहतूक वाहनांची बांधणी करीत असताना प्रत्येक वाहनांची क्षमता निश्चित केली जाते. त्यानुसार वाहनांची परिवहन विभागाकडे नाेंदणीही केली जाते. मात्र, प्रत्यक्षात वाहतूक करीत असताना २० टक्के ओव्हरलोड वाहतूक करीत असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षभरात प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने तपासणी केलेल्या २ हजार ८८० वाहनांत ८४१ वाहने ओव्हरलोड आढळली असून, त्यांच्याकडून २ कोटी ३७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणे मोटार वाहन कायद्याने गुन्हा आहे. तपासणीत ओव्हरलोड आढळून आल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाची पथके कारवाई मोहीम राबवितात. लातूर जिल्ह्यातून रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या मार्गावर पथकाची नजर असते. शिवाय, लातूरला मोठी बाजारपेठ असल्याने विविध प्रकारची मालवाहतूक केली जाते. त्यात कृषी मालाचाही समावेश आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत लातूरच्या परिवहन विभागाने राबविलेल्या वाहन तपासणीत २ हजार ८८० अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात किरकोळ वाढ आढळून आलेल्या वाहनांना समज देऊन सोडण्यात आले. पण, ५०० किलोपेक्षा अधिक ओव्हरलोड असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ओव्हरलोड वाहन थेट काट्यावर...
प्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहन तपासणीत ओव्हरलोड वाहतुकीचा संशय आल्यास संबंधित वाहन थेट काट्यावर नेले जाते. एकदा का काटा झाला अन् त्यात ओव्हरलोड माल आढळून आला की लागलीच ऑनलाईन दंड मारला जातो. यासाठी परिवहन विभागाचे स्वतंत्र पथक रस्त्यावर असते. बार्शी रोड, रिंग रोड, औसा रोड, अंबाजोगाई रोड, नांदेड, तुळजापूर मार्गावर पथकाचे विशेष लक्ष असते. या पथकाकडून ट्रक, टेम्पोसह ग्रामीण भागातून येणारी छोटी वाहनेही तपासली जातात.

हेल्मेट, सीटबेल्टचाही दंड...
प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने वर्षभरात २ हजार ८६० दुचाकी चालकांना हेल्मेटचा वापर न केल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ९ लाख ५७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच २ हजार २१७ चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली असता त्यात ७३९ जणांनी सीटबेल्ट लावला नसल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ७ लाख ३६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक नको...
वाहनधारकांनी क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करू नये. परिवहन विभागाच्या तपासणीत ओव्हरलोड वाहतूक आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. मागील वर्षभरात २ कोटी ३७ लाख ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ओव्हरलोड मालवाहतूक केल्यास वाहनांचे नुकसान होतेच शिवाय अपघाताचा धोका असतो, त्यामुळे वाहन मालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. 
- आशुतोष बारकुल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी.

Web Title: RTO bang! 2 crore 37 lakhs fined to 841 vehicle owners for transporting overload

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.