आरटीओकडे आली अत्याधुनिक सुविधांची वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:44 AM2021-09-02T04:44:11+5:302021-09-02T04:44:11+5:30
परिवहन विभागाकडून लातूर विभागाला चार नवीन चारचाकी वाहने मिळाली असून या वाहनांत अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. वेगमर्यादा ...
परिवहन विभागाकडून लातूर विभागाला चार नवीन चारचाकी वाहने मिळाली असून या वाहनांत अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. वेगमर्यादा निश्चित करून देण्यात आलेल्या रस्त्यावर वेगमर्यादा ओलांडून जाणारे वाहन सहजपणे टिपता येणार आहे. काचांना बसविण्यात आलेली काळ्या रंगाची फिल्म किती जाडीची आहे याची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर चालक मद्यपान करून तर वाहन चालवित नाही ना, याचीही तपासणी करण्यासाठी ब्रेथॲनालायझर मशीन याच वाहनात बसविण्यात आली आहे. त्यामुळे भरारी पथकांना एखाद्या वाहनाला खटला देताना तपासणीत येणारी अडचण दूर होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन गाड्या दाखल झाल्या असून त्यांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, अशितोष बारकुल, मोटार वाहन निरीक्षक सविता पवार, धनंजय पाटील, सचिन बंग, शीतल गोसावी, शांताराम साठे, अशोक जाधव, मनोज लोणारे, धनंजय थोरे, मंगेश गवारे यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक धनंजय लोंढे, उमेश सांगळे, सी. एस. वाघमारे, आर. जी. कुलकर्णी, वाहन चालक यु. बी. जगताप, उमेश दुरांडे, उमाकांत सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
लातूर विभागाला ४ चार वाहने...
परिवहन विभागाकडून लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाला चार अत्याधुनिक वाहने देण्यात आली आहेत. त्यातील दोन लातूर, एक अंबाजोगाई व १ उस्मानाबाद कार्यालयाला देण्यात आली आहे. या वाहनात सर्व आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे कामाला गती येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी सांगितली.
कॅप्शन :
लातूरच्या आरटीओ कार्यालयात आलेल्या नवीन वाहनांचे पूजन प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांच्याहस्ते केले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, एआरटीओ आशितोष बारकुल, सविता पवार, अशोक जाधव, शीतल गोसावी, सचिन बंग.