‘धनत्रयाेदशी’च्या मुहूर्तावर साधला सुवर्ण खेरदीचा याेग; काेट्यवधींची उलाढाल
By राजकुमार जोंधळे | Published: November 10, 2023 09:30 PM2023-11-10T21:30:41+5:302023-11-10T21:30:50+5:30
लातुरातील सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी...
लातूर : शहरासह जिल्हाभरात धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर अनेकांनी साेने खरेदीतून सुवर्ण याेग साधला असून, दिवाळी उत्सवाला गुरुवारी वसुबारसने प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी दिवसभर साेने खरेदीसाठी महिलांसह ग्राहकांची माेठ्या प्रमाणावर सराफा दुकानात गर्दी हाेती. यंदा धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर साेने खरेदी करणाऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणावर असल्याचे सराफांनी सांगितले. शुक्रवारी साेने २४ कॅरेट साेन्याचा भाव ६१ हजार आणि जीएसटी १८६२ असा एकूण ६२ हजार ८६२ रुपयांवर पाेहोचला हाेता, तर चांदी प्रतिकिलाे ७३ हजार ४०० आणि जीएसटी २२०० असा एकूण ७५ हजार ६०० रुपयांवर हाेता. दिवसभरात लातूरच्या सराफा बाजारात काेट्यवधींची उलाढला झाली आहे.
दिवाळी उत्सवात धनत्रयाेदशीला साेने खरेदी शुभ मानली जाते. ही प्रथा आजही अनेक जण मनाेभावे जपतात. गत वर्षीच्या तुलनेत यंदा साेन्याच्या दरात वाढ झाली असतानाही खरेदीचा उत्साह मात्र कायम आहे. शुक्रवारी धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर साेने खरेदीसाठी ग्राहकांनी सराफा बाजारात दिवसभर गर्दी केली हाेती. रविवारी लक्ष्मीपूजन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीचा परिणाम साेन्या-चांदीच्या दरावर हाेत आहे. साेन्या-चांदीच्या दरात चढ-उतार हाेत आहे. अशा स्थितीतही शुक्रवारी अनेकांनी साेने खरेदीचा याेग साधला आहे. काहींनी लग्न साेहळ्यासाठी लागणाऱ्या खरेदीला प्राधान्य देत धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर साेन्या-चांदीचे खरेदी केली.
दशकभरात ४० हजारांनी साेन्या-चांदीचे दर वाढले...
गत बारा-तेरा वर्षांच्या काळात साेन्या-चांदीच्या दरात तब्बल ४० हजारांनी वाढ झाली आहे. आता साेन्याने ६२ हजारांचा तर चांदीच्या दराने ७५ हजारांचा टप्पा गाठला आहे. अनेकांनी गुंतर्वणूक म्हणून साेने खरेदीला प्राधान्य दिला आहे. - सचिन शेंडे-पाटील, सराफा
सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी...
लातूरसह उदगीर, अहमदपूर, निलंगा, औराद, औसा येथील सराफा बाजारात धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर साेने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी दिवसभर माेठ्या प्रमाणावर गर्दी केली हाेती. साेन्याचा प्रतिताेळा दर ६२ हजारांवर गेला तरी खरेदीला प्रतिसाद मिळाला आहे. - महेश शिंदे-बाकलीकर, सराफा