‘सगेसोयरे अध्यादेश’ आचारसंहितेपूर्वी काढतील, तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही: मनोज जरांगे
By संदीप शिंदे | Published: March 13, 2024 05:41 PM2024-03-13T17:41:05+5:302024-03-13T17:42:17+5:30
आमच्या आया-बहिणींवर लाठीमार; त्यांची माफी कोण मागणार -मनोज जरांगे पाटील
अहमदपूर/ निलंगा/ औराद शहाजानी/ कासारशिरसी : मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून, आचारसंहिता लागण्यापूर्वी ‘सगेसोयरे अध्यादेश’ काढतील, अशी आशा आहे. सरकारने तसे नाही केले, तर आचारसंहितेनंतर सरकारच्या डावाला प्रतिडावाने उत्तर देऊ. एक इंचही मागे हटणार नाही, असे ठाम प्रतिपादन करीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणामुळे माझी चिडचिड होऊन चुकून शब्द गेले, त्याबद्दल माफी मागितली. मात्र, आंदोलनात आमच्या आया- बहिणींवर लाठीमार करून डोकी फोडली, त्यांची माफी कोण मागणार, असा सवालही संवाद बैठकांमध्ये उपस्थित केला.
अहमदपूर, निलंगा तालुक्यांतील माळेगाव कल्याणी, कासारशिरसी, निलंगा शहर आणि लातुरात बुधवारी संवाद बैठका झाल्या. अहमदपूरमध्ये जरांगे पाटील म्हणाले, सरकारने लवकरात लवकर ‘सगेसोयरे’संबंधी अध्यादेश काढावा. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता. मात्र, तो सरकारने पाळला नाही. सरकार मराठा समाजाला मागास मानत असेल, तर मागास प्रवर्गाबाहेरचे आरक्षण का दिले. समाज ३० टक्के आणि आरक्षण १० टक्के, हे कुठल्या धर्तीवर. माझ्यावर, सामान्य मराठाबांधवांवर एसआयटी नेमून आंदोलन दडपण्याचा डाव आहे.
निलंगा येथील वृदांवन मंगल कार्यालयातील बैठकीत ते म्हणाले, कुणबी मराठा, सगेसोयरे व हैदराबाद गॅझेटला मान्यता देऊन ओबीसीतूनच आरक्षण द्यावे. २०१८ मध्ये १३ टक्के दिले आणि २०२४ मध्ये १० टक्के न टिकणारे आरक्षण दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुटी नाही. सरकार दडपशाही करून गुन्हे दाखल करीत आहे. त्याविरोधात सहा कोटी मराठे एकत्र येऊन दहशत मोडून काढतील, असेही मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावले.