‘सगेसोयरे’चा अध्यादेश आचारसंहितेपूर्वी काढतील, सरकारने तसे न केल्यास...: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 05:52 AM2024-03-14T05:52:47+5:302024-03-14T05:53:17+5:30
कुणबी मराठा, सगेसोयरे व हैदराबाद गॅझेटला मान्यता देऊन ओबीसीतूनच आरक्षण द्यावे हीच आमची आग्रही मागणी आहे आणि त्यासाठी आमचा लढा आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर : मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून, आचारसंहिता लागण्यापूर्वी ‘सगेसोयरे अध्यादेश’चा काढतील, अशी आशा आहे. सरकारने तसे न केल्यास आचारसंहितेनंतर सरकारच्या डावाला प्रतिडावाने उत्तर देऊ, असे मत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केले.
अहमदपूर, निलंगा तालुक्यांतील माळेगाव कल्याणी, कासारशिरसी, निलंगा शहर आणि लातुरात बुधवारी जरांगे-पाटील यांच्या संवाद बैठका झाल्या. अहमदपूरमध्ये ते म्हणाले, सरकारने लवकरात लवकर ‘सगेसोयरे’संबंधी अध्यादेश काढावा. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता. मात्र, तो सरकारने पाळला नाही. माझ्यावर, सामान्य मराठा बांधवांवर एसआयटी नेमून आंदोलन दडपण्याचा डाव आहे.
कुणबी मराठा, सगेसोयरे व हैदराबाद गॅझेटला मान्यता देऊन ओबीसीतूनच आरक्षण द्यावे हीच आमची आग्रही मागणी आहे आणि त्यासाठी आमचा लढा आहे असे जरांगे पाटील म्हणाले.