लातूर एमआयडीसीत साकोळकर फर्निचरला आग; कोट्यवधीचे नुकसान
By राजकुमार जोंधळे | Published: December 23, 2023 04:10 PM2023-12-23T16:10:48+5:302023-12-23T16:11:06+5:30
अग्निशमन दलाचे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न
लातूर : शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या सकोळकर फर्निचर गोदमाला शनिवारी दुपारी अचानक आग लागली असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी बघ्यांची गर्दी झाल्याने एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. याबाबत अद्याप पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही, असे पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांनी सांगितले.
लातुरतील जुन्या एमआयडीसी परिसरात सकोळकर नावाचे मोठे फर्निचरचे शो-रूम आणि गोदाम आहे. या शोरूमला शनिवारी दुपारी आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. शोरूम-गोदामात ठेवण्यात आलेले कोट्यवधीचे फर्निचर जळून खाक झाले आहे. घटनास्थळी होणाऱ्या पंचनाम्यानंतरच नुकसानीचा आकडा समोर येणार आहे. शोरूम आणि गोदामात जवळपास दोन ते तीन कोटींचे फर्निचर असल्याचा अंदाज आहे.
तीन तासापासून अग्निशमन दलाचे प्रयत्न...
आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत गेल्या तीन तासापासून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. वृत्त लिहिपर्यत ही आग आटोक्यात आलेली नव्हती, असे एमआयडीसी ठण्याच्या पोलिसांनी सांगितले.