एन-९५ च्या नावाखाली बोगस मास्कची विक्री !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:23 PM2020-07-07T17:23:11+5:302020-07-07T17:26:41+5:30
लातूरच्या बाजारात मास्क, सॅनिटायझरची मासिक उलाढाल कोटींवर गेली आहे़
लातूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वात सुरक्षित मास्क म्हणून ओळख असलेल्या एन ९५ चा बाजार तेजीत आहे़ कापडी मास्कला प्लास्टिकचे फिल्टर लावून बोगस मास्कची विक्री जोरात आहे़ यातून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे़ लातूरच्या बाजारात मास्क, सॅनिटायझरची मासिक उलाढाल कोटींवर गेली आहे़
सुरक्षित मास्क म्हणून एन ९५ मास्कचा पहिल्या टप्प्यात तुटवडा झाला होता़ वाढती मागणी लक्षात अनेक औषधी दुकानदारांनी एन ९५ च्या विक्रीला पसंती दिली़ मात्र यात बोगसपणा वाढला असून ज्याला सुरक्षित म्हणून आपण पसंती दर्शवित आहोत, त्यापासूनच जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे़ लातूरच्या बाजारात या मास्कची किंमत मनमानी असून १०० रूपयांपासून २५० रूपयांपर्यंत विक्री केली जात आहे़ त्यात असलेल्या लेअरवर किंमती ठरविल्या जात आहेत़ साध्या कापडाचे दोन ते तीन लेअर करून त्याला प्लास्टिकचे फिल्टर बसविण्यात आले आहे़
कडक कारवाई करणार
मेडिकल दुकानांची नियमित तपासणी सुरू आहे. निर्धारित किंमतीपेक्षा जास्त किंमतीने एन ९५ मास्कची विक्री दुकानांतून होत असेल, तर त्यावर आम्ही कडक कारवाई करू. ग्राहकांनीही आमच्याकडे तक्रार केल्यास दखल घेतली जाईल.
- सचिन बुगड, सहायक आयुक्त, औषधी प्रशासन, लातूर.