वाहनधारकांची तारांबळ, लातूर जिल्ह्यात १७५ पेट्रोलपंपांवरील ८ लाख लिटर इंधन विक्री ठप्प

By हणमंत गायकवाड | Published: January 2, 2024 06:00 PM2024-01-02T18:00:02+5:302024-01-02T18:00:32+5:30

टँकर आणि ट्रकचालकांच्या संपाचा सर्वाधिक फटका इंधन वाहतुकीला बसला आहे.

Sales of 8 lakh liters of fuel stopped at 175 petrol pumps in Latur districts | वाहनधारकांची तारांबळ, लातूर जिल्ह्यात १७५ पेट्रोलपंपांवरील ८ लाख लिटर इंधन विक्री ठप्प

वाहनधारकांची तारांबळ, लातूर जिल्ह्यात १७५ पेट्रोलपंपांवरील ८ लाख लिटर इंधन विक्री ठप्प

लातूर : ट्रक, टँकर चालकांनी नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात संप पुकारल्याने त्याचा फटका पेट्रोलपंपांना बसला असून, काही तासांतच इंधन संपल्याने शहरातील पंप बंद करावे लागले. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. काल सोमवारी दुपारनंतर जिल्ह्यातील १७५ पेट्रोलपंपांवर ३ लाख लिटर पेट्रोल आणि साडेपाच लाख लिटर डिझेलची विक्री ठप्प झाली. यामुळे पंपचालकांनाही मोठा तोटा सहन करावा लागला. 

लातूर जिल्ह्यामध्ये टँकर आणि ट्रकचालकांच्या संपाचा सर्वाधिक फटका इंधन वाहतुकीला बसला आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपांवरील पेट्रोल-डिझेल संपलेले होते. ज्या ठिकाणी काही प्रमाणात इंधन शिल्लक होते, त्या ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. सामान्य ग्राहकांच्या रोषाला पंपचालकांना सामोरे जावे लागले. जिल्ह्यात १७५ पंप आहेत. त्यापैकी ४० पंप एकट्या लातूर शहरात आहेत. या सर्व पंपांतून पेट्रोल अडीच ते तीन लाख आणि डिझेल पाच ते साडेपाच लाखांची विक्री ठप्प झालेली होती.

अत्यावश्यक सेवेसाठी इंधन देण्याचे निर्देश...
वाहतूकदारांचा संप असल्याचे समजताच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पेट्रोलपंपचालकांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी इंधन देण्यात यावे, असे निर्देश दिले. त्यामुळे सामान्य वाहनधारकांना दुपारपर्यंत इंधन मिळाले नव्हते. त्यानंतर शहरातील काही पेट्रोलपंप सुरू झाले. मात्र, रांगा लागलेल्या होत्या. सोमवारी रात्रीपासून ३ वाजेपर्यंत शहरातील सर्वच पेट्रोलपंप बंद होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पेट्रोल-डिझेलची साठेबाजी करू नये, असे आवाहन केले होते. तरीही शिल्लक असणाऱ्या इंधनाची विक्री करण्याचे पेट्रोलपंपचालकांनी टाळलेच होते.

दूध, भाजीपाला वाहतुकीला फटका...
दूध संकलन करणाऱ्या वाहनांना आणि भाजीपाल्यांची वाहतूक करणाऱ्या काही वाहनांना पेट्रोल-डिझेल नसल्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागले. दुपारनंतर काही पेट्रोलपंप सुरू झाल्यानंतर वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पेट्रोलपंपांवर बंदचे फलक; बॅरिकेड्सही...
वाहनांशिवाय वावरणे शक्य नाही. मात्र, वाहतूकदारांच्या संपामुळे अडचण झाली. पेट्रोलपंपच बंद ठेवावे लागले. शहरातील अनेक पेट्रोलपंपांबाहेर बंदचे फलक लावण्यात आले होते. शिवाय, काही पेट्रोलपंपांवर बॅरिकेड्स लावूनही पेट्रोल नसल्याचे सांगण्यात आले. इंधनाअभावी वाहनधारकांचे मोठे हाल झाले.

काही वाहनधारकांनी कॅन भरून घेतले...
सोमवारी रात्री उशिरा पंपांवर थांबून काही वाहनधारकांनी कॅन भरून घेतले. मंगळवारी सकाळपासूनच पंप बंद असल्याने नोकरदार, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. अनेकांनी पेट्रोलपंपानजीकच वाहने उभे करून ठेवली होती.

इंधन आणण्यासाठी १५ टँकर सोलापूरला...
लातूर जिल्ह्याला सोलापूर येथील पाखणी येथून इंधन पुरवठा होतो. त्यानुसार १५ टँकर सोलापूरला इंधन आणण्यासाठी गेले होते. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत होईल, असे पंपचालक असोसिएशनचे अध्यक्ष आदेश शहा यांनी सांगितले.

दुपारी ४ नंतर काही पेट्रोलपंप सुरू...
दुपारनंतर शहरातील काही पेट्रोलपंप सुरू झाले. इंधन घेण्यासाठी वाहनधारकांनी रांगा लावल्या होत्या. एक नंबर चौक, उषाकिरण, अंबाजोगाई रोड तसेच औसा रोडवरील काही पेट्रोलपंप सुरू झाले होते. सायंकाळनंतर शहरातील आणखी पेट्रोलपंप सुरू होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Sales of 8 lakh liters of fuel stopped at 175 petrol pumps in Latur districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.