उजनीच्या पाण्यासाठी मंत्रीपदाचा राजीनामा देईन - संभाजी पाटील निलंगेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 05:33 AM2019-09-15T05:33:21+5:302019-09-15T05:33:36+5:30
गणेश विसर्जनाऐवजी लातूरमध्ये हजारो गणेश मूर्तींचे दान करण्यात आले़ पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़
लातूर : गणेश विसर्जनाऐवजी लातूरमध्ये हजारो गणेश मूर्तींचे दान करण्यात आले़ पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ त्यामुळेच पुढच्या दोन वर्षांच्या काळात लातूरला उजनीचे पाणी देण्याची प्रक्रिया सुरू न झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन आणि पाण्यासाठी संघर्ष करेन, असा निर्धार पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा लातूर पॅटर्न राबविला गेला़ त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जिल्ह्यातील पाण्याच्या भीषण स्थितीचा मुद्दा समोर आला़ या संदर्भात पालकमंत्री निलंगेकर यांनी लातूर-निलंगा प्रवासात संवाद साधला. ते म्हणाले, वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यासह लातूर-उस्मानाबाद भागातील दुष्काळ कायमचा दूर केला जाईल़ या महत्त्वाकांक्षी योजनेत लातूर-उस्मानाबादचा समावेश करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली़
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरीही मिळाली आहे़ तसेच उजनीचेही पाणी लातूरला देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना ते म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत लातूरसाठी उजनीचे पाणी आणणारच़ पुढच्या दोन वर्षाच्या काळात याबाबत प्रक्रिया सुरू नाही झाल्यास मंत्रिपदाचाही त्याग करीऩ कुठलेही पद धारण न करता लातूरच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेन, हा माझा शब्द आहे़ आम्ही आज दुष्काळजन्य स्थिती अनुभवत आहोत़ पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला ही स्थिती येणार नाही, यासाठी आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल़ तेच मी करीत आहे़
>१७१ सामंजस्य करार
ंउद्योगासाठी आवश्यक असलेले कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी नामांकित औद्योगिक समूहासोबत १७१ सामंजस्य करार करण्यात आले आहेत़ ज्याद्वारे सव्वा दोन लाखांवर युवकांना प्रशिक्षण मिळाले़ त्यातील १ लाख १८ हजार उमेदवारांना रोजगार आणि स्वयंरोजगार प्राप्त झाला़ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या अंतर्गत विविध योजनांमधून साडेनऊ कोटी रकमेचे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना केले आहे, असेही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.