मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजी सेनेचा रेल्वे रोकोचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:14 AM2021-07-03T04:14:00+5:302021-07-03T04:14:00+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह सारथी संस्थेस तत्काळ आर्थिक तरतूद करावी. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह सारथी संस्थेस तत्काळ आर्थिक तरतूद करावी. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती करावी. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास निधीची तरतूद करावी. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन शासकीय नोकरी द्यावी. शिवस्मारकाचे रखडलेले काम तत्काळ सुरू करावे. राज्यातील गड, किल्ल्यांचे संवर्धन करावे अशा मागण्यांसाठी संभाजी सेनेच्या वतीने पानगाव येथील रेल्वे स्टेशन मास्तरांना निवेदन देऊन रेलरोको आंदोलन करणार असल्याचे कळविले होते.
त्यानुसार शुक्रवारी सकाळी १० वाजता नांदेडकडून बेंगलोरकडे जाणारी बेंगलोर एक्स्प्रेस रेल्वे गाडी येथील स्थानकावर रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
स्थानकावर चोख पोलीस बंदोबस्त...
संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांना आंदोलनापासून रोखण्याचा प्रयत्न कालपासून पोलीस करीत होते. तरीही पाच ते सहा कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकवा देत रेल्वे येत असताना रूळ पटरीवर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तेव्हा पोलिसांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याविरुद्ध रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी लातूर पोलीस, रेल्वे पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे पानगाव रेल्वेस्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. स्थानकाला छावणीचे स्वरूप आल्याचे पाहावयास मिळाले.