अलर्ट झोनमधील ४० कुक्कुटपक्ष्यांचे नमुने तपासणीस; बर्डफ्लूच्या भीतीमुळे पोल्ट्री चालकांना सूचना
By हरी मोकाशे | Updated: January 20, 2025 19:25 IST2025-01-20T19:25:01+5:302025-01-20T19:25:44+5:30
उदगीरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय व पाण्याची टाकी येथे बर्डफ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून आला.

अलर्ट झोनमधील ४० कुक्कुटपक्ष्यांचे नमुने तपासणीस; बर्डफ्लूच्या भीतीमुळे पोल्ट्री चालकांना सूचना
लातूर : बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याने उदगीरातील १० किमी त्रिजेच्या परिसरात अलर्ट झोन तयार करण्यात आला आहे. सोमवारी या परिसरातील ४० कुक्कुटपक्ष्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता अहवालाकडे लक्ष लागून आहे.
उदगीरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय व पाण्याची टाकी येथे बर्डफ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून आला. त्यामुळे प्रशासनाने येथील १० किलोमीटर त्रिज्येतील परिसर अलर्ट झोन घोषित करण्यात आला. तसेच निर्जंतुकीकरण करण्यात आले. शिवाय, बाधित क्षेत्रात नागरिकांच्या हालचालीस, तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. हा प्रतिबंध २१ दिवस असून दर आठवड्यास निर्जंतुकीकरणाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
अहवालाकडे लक्ष...
सोमवारी आणखी दोन कावळ्यांचा मृत्यू झाला असून दगावलेल्या कावळ्यांची संख्या ६४ वर पोहोचली आहे. बर्डफ्लूमुळे ४० कुक्कुटपक्ष्यांचे नुमने पुण्याच्या प्रयोगशाळेस पाठविण्यात आले आहेत. अहवालाकडे लक्ष आहे. पोल्ट्री चालकांनी परिसराचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. बाहेरच्या व्यक्तीस प्रवेश देऊ नये. कुक्कुटपक्षी मृत्युमुखी पडल्यास तात्काळ माहिती द्यावी.
- डॉ. श्रीधर शिंदे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन.
हुतात्मा स्मारकासमोरील वाहने हलविली...
बर्ड फ्लूमुळे स्थानिक प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उद्यानासमोरील खाजगी वाहने काढण्यात आली आहेत. नागरिकांनी भीती बाळगू नये व कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. - सुशांत शिंदे, उपजिल्हाधिकारी, उदगीर