औसा तालुक्यात उद्यापासून सरपंच निवडीचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:21 AM2021-02-05T06:21:29+5:302021-02-05T06:21:29+5:30
औसा तालुक्यातील ४६ गावाचा निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. या ४६ पैकी ४५ गावात १५ जानेवारी रोजी मतदान झाले. ...
औसा तालुक्यातील ४६ गावाचा निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. या ४६ पैकी ४५ गावात १५ जानेवारी रोजी मतदान झाले. याचा निकाल १८ जानेवारी राेजी लागला. एका गावातील निवडणूक बिनविरोध झाली आहे. ग्रामपंचायतींचा निकाल लागला तरी सरपंच निवडीचा कार्यक्रम निश्चित न झाल्याने गावोगावी उत्सुकता वाढली होती. यामुळे सदस्यांची पळवापळवी होऊ नये यासाठी अनेक गावचे सदस्य सहलीला गेले होते. त्याचबराेबर ज्या गावातील सदस्यांचा गावातच मुक्काम आहे. त्यांच्यावर गाव पुढाऱ्यांचे विशेष लक्ष होते. आघाडीतील निवडून आलेल्या सदस्यांची संख्या काठावर असलेल्या गावात सरपंच कोण होणार, अशी स्थिती सध्या दिसून येत आहे. यामुळेच तत्काळ कार्यक्रम लावावा आणि यावर एकदाचा शिक्कामोर्तब करावा, अशी मागणी गावागावातून हाेत हाेती. दरम्यान, आता सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम निश्चित झाला असून ४ ते १२ फेब्रुवारी या आठ दिवसांच्या कालावधीत ४६ गावांचे सरपंच आणि उपसरपंच निवडण्यात येणार आहेत.
गुरुवार, ४ फेब्रुवारी राेजी औसा तालुक्यातील उंबडगा बु, हासाळा, शिवणी बु, चलबुर्गा, चिंचोली काजळे, कुमठा व भादा या गावांतील सरपंच व उपसरपंचांची निवड होणार आहे. तर शुक्रवार, ५ फेब्रुवारी राेजी लामजना, टाका, पारदेवाडी, लोदगा, शिंदाळा लो, बऱ्हाणपूर, तळणी या गावातील सरपंचाची निवड होणार आहे. ६ आणि ७ फेब्रुवारी राेजी शनिवार, रविवार असल्याने सुट्टी राहणार आहे. साेमवार, ८ फेब्रुवारी राेजी उंबडगा ख, हसेगाव, धानोरा, वाघोली, कमालपुर, माळुंब्रा या गावातील निवड होणार आहे. तर मंगळवार, ९ फेब्रुवारी राेजी मोगरगा, मासूर्डी, कार्ला, सिंदाळा (ज), शिंदाळा वाडी, लखनगाव आणि नांदुर्गा या गावांतील निवड होणार आहे. बुधवार,१० फेब्रुवारी राेजी सेलू, हसेगाव वाडी, भुसणी, जयनगर, समदर्गा,मसलगा खुर्द, नागरसोगा या गावातील सरपंचाची निवड होणार आहे. गुरुवार, ११ फेब्रुवारी रोजी औसा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेलकुंड गावासह हरेगाव, जमालपूर, कोरंगळा, सत्तरधरवाडी, मंगरूळ या गावच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवड होणार आहे. शेवटच्या दिवशी शुक्रवार, १२ फेब्रुवारी राेजी उजनी, खरोसा, तुंगी बु व तपसे चिंचोली येथील सरपंच, उपसरपंच पदाची निवड होणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.