पीक कर्जाच्या वसुलीसाठी बचत खाते होल्डवर ! ऐन पेरणीच्या मोसमात शेतकऱ्यांची गैरसोय

By हणमंत गायकवाड | Published: July 18, 2023 07:54 PM2023-07-18T19:54:16+5:302023-07-18T19:54:31+5:30

जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे; परंतु पेरणीच्या मोसमात पीक कर्ज वसुलीची सक्ती करणे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे.

Savings account on hold for crop loan recovery! Disadvantage of farmers during sowing season | पीक कर्जाच्या वसुलीसाठी बचत खाते होल्डवर ! ऐन पेरणीच्या मोसमात शेतकऱ्यांची गैरसोय

पीक कर्जाच्या वसुलीसाठी बचत खाते होल्डवर ! ऐन पेरणीच्या मोसमात शेतकऱ्यांची गैरसोय

googlenewsNext

लातूर : राष्ट्रीयीकृत तसेच काही सहकारी बँकांनी पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड केले आहे. शिवाय, त्यांना जामीन देणाऱ्या जामीनदाराच्या खात्यालाही लगाम लावला आहे. बचत खाते होल्डवर ठेवल्यामुळे खात्यात पैसे जमा होतात; परंतु ते काढता येत नाही. यामुळे ऐन पेरणीच्या मोसमात शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.

जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे; परंतु पेरणीच्या मोसमात पीक कर्ज वसुलीची सक्ती करणे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. पीक कर्जाची वसुली पिकांची रास होऊन शेतमाल मार्केटमध्ये विक्री करून शेतकऱ्यांच्या हाती पैसे येतात; पण खरीप पेरणीच्या हंगामात कर्जाची वसुली बँकेने हाती घेतलेली आहे. आधीच यंदाचा मृग आणि आर्द्रा नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस पडला नाही. त्यामुळे पेरण्या लांबल्या आहेत. सध्या काही भागात पेरण्या झाल्या. तर काही भागात चालू आहेत. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळी बचत खाते होल्ड केले आहे. सध्याचा ८० टक्के व्यवहार ऑनलाइन होतो आहे. खाते होल्डवर ठेवल्यामुळे खात्यात पैसे जमा करता येतात; पण काढता येत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे. चुकीच्या वेळी होत असलेली सक्तीची वसुली तत्काळ बंद करावी. पीक विमा आल्यानंतर ती रक्कम कर्ज खात्यात जमा करून घ्यावी. कर्जदाराबरोबर जामीनदाराला वेठीस धरणे बेकायदेशीर आहे. बँकांनी ही मनमानी थांबवावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केली आहे.

शेतकरी संघटना बँक विरोधात आंदोलन करणार
शेतकऱ्यांचे बचत खाते तत्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी दिला आहे. कर्जाची वसुली नुकसानभरपाई, अनुदान, पीक विमा आल्यानंतर करावी. सध्या शेतकऱ्यांच्या मागे पेरण्याची कामे आहेत. बी बियाणांच्या आणि खतांच्या खरेदीसाठी बचत खाते चालू असणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित बँकांनी तत्काळ होल्डवर ठेवलेले खाते सुरू करणे आवश्यक असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केले आहे..

Web Title: Savings account on hold for crop loan recovery! Disadvantage of farmers during sowing season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.