लातुरात टंचाईच्या झळा; २७ गावांच्या अधिग्रहण प्रस्तावावर निर्णय होईना!
By संदीप शिंदे | Published: April 19, 2023 06:07 PM2023-04-19T18:07:26+5:302023-04-19T18:07:46+5:30
या गावांनी पंचायत समितीकडे विहीर,विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा,अशी मागणी केली आहे.
लातूर : जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या चटक्यासोबतच प्रकल्प, विहिरी, विंधन विहिरीची पाणीपातळी खालवत चालली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २७ गाव-वाड्यांवर पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा, यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, त्यावर अद्याप पंचायत समिती आणि तहसील प्रशासनाकडून कोणताच निर्णय झालेला नाही. परिणामी, २७ गावांतील नागरिकांना प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा लागली आहे.
जिल्ह्यात २२ गावे आणि ५ वाड्या असे एकूण २७ गावांनी ३० प्रस्ताव संबधित पंचायत समितीकडे सादर केले आहेत. यामध्ये लातूर तालुक्यातील १, औसा २, निलंगा ३, अहमदपूर १६, उदगीर २ तर जळकोट तालुक्यातील ३ गावांचा समावेश आहे. या गावांनी पंचायत समितीकडे विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार तहसील कार्यालयाकडे १४ गावांचे प्रस्ताव सादर झाले आहेत. हे प्रस्ताव तहसील कार्यालयाच्या मान्यतेनंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जातील. त्यांच्याकडून प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करण्यात येणार असून, त्यानंतरच प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. प्रकल्प, नदी, नाले ओसंडून वाहिले होते. परिणामी, पाणीपातळीत वाढ झाली. मात्र, आता उन्हाचा पारा वाढत असल्याने जलस्रोतांची पाणीपातळी कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव दाखल केल्यावर तहसील आणि नंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जातात. त्यामुळे या प्रस्तावांना वेळ लागत असून, यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरावरच अधिकार देण्याची मागणी होत आहे.
जुलै ते ऑगस्टसाठी सव्वा चार कोटींचा आराखडा...
जिल्ह्यात एप्रिल ते जून या कालावधीत पाणी टंचाई निवारणासाठी चार कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाने जुलै ते ऑगस्ट या कालावधीत पावसाचे प्रमाण कमी सांगितले आहे. परिणामी, नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून प्रशासनाकडून सव्वा चार कोटींचा विशेष टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, त्यास मान्यताही देण्यात आली आहे.
अधिग्रहणासोबतच टँकरद्वारे होणार पाणीपुरवठा...
टंचाई निवारणासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविणे, विहिरीचे खोलीकरण करणे, बुडक्या घेणे, विंधन विहिरी घेणे, विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, प्रगती पथावरील नळ योजना पूर्ण करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. त्यानुसार प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावधीपर्यंत २७ गावांचे प्रस्ताव आले असून, मे महिन्यात उन्हाचा पारा वाढल्यास या प्रस्तावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.