बालकांसाठीच्या औषधांचा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 05:18 PM2018-09-02T17:18:05+5:302018-09-02T17:18:47+5:30
लातूर जिल्हा परिषद : नातेवाईकांना करावी लागतेय पदरमोड
हरी मोकाशे, लातूर : वातावरणातील बदलामुळे बालकांत सध्या सर्दी, खोकला, डेंग्यूसदृश्य आजार वाढले आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचारासाठी गर्दी होत आहे. परंतु, जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्रांत अँन्टीबायोटिक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बालकांच्या नातेवाईकांना खाजगी मेडिकलमधून औषधांची खरेदी करावी लागत आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २५२ उपकेंद्र आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रातून किमान ७-८ गावातील रुग्णांना आरोग्य सेवा दिली जाते. त्यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्रात दररोज तपासणी आणि उपचारासाठी किमान ४० पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी असते. सध्या पावसाळा असल्याने वातावरणात बदल झाला आहे. नेहमीच्या ढगाळ वातावरणामुळे जंतूसंसर्ग होत आहे. सर्दी, ताप, खोकला, न्यूमोनिया, गॅस्ट्रोसदृश्य आजार, डेंग्यसदृश्य आजार वाढत आहेत.
दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांत तापाचे औषध वगळता अन्य काही औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले औषध हे खाजगी मेडिकलमधून खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना पदरमोड करावी लागत आहे. केवळ डॉक्टरांच्या तपासणी शुल्काची बचत व्हावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी जायचे का? असा सवाल रुग्णांच्या नातेवाईकांतून केला जात आहे.
रुग्णकल्याण समित्यांना सूचना
बालकांसाठीच्या काही औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने ही दूर करण्यासाठी खाजगी मेडिकलमधून औषधांची खरेदी करावी, अशा सूचना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्ण कल्याण समित्यांना केल्या आहेत. या समित्या वार्षिक १ लाख ३५ हजार रुपयांपर्यंत औषधांची खरेदी करु शकतात. सध्या बहुतांश रुग्णकल्याण समित्यांनी ५० ते ६० हजारांपर्यंत खरेदी केली असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
६० प्रकारच्या औषधांची मागणी
औषध तुटवड्याची समस्या सोडविण्यासाठी ६० प्रकारच्या औषधांची मागणी करण्यात आली आहे. त्याची टेंडर प्रक्रियाही शासनाच्या हापकीनकडे पूर्ण झाली आहे. त्यातील काही औषधे उपलब्ध होत आहेत. आठवडाभरात सर्व औषधे उपलब्ध होतील, असे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.