धुळीत मास्कविना शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:23 AM2021-08-13T04:23:46+5:302021-08-13T04:23:46+5:30
किल्लारी (जि. लातूर) : किल्लारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या प्रशालेत गुरुवारी इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात ...
किल्लारी (जि. लातूर) : किल्लारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या प्रशालेत गुरुवारी इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या वेळी शाळेत साफसफाई करण्यात आली नसल्याने आणि मास्कची सुविधा उपलब्ध न करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना धुळीत, मास्कविना परीक्षा द्यावी लागली. त्यामुळे पालकांतून संताप व्यक्त करण्यात आला.
इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांची गुरुवारी सकाळी ११ ते १२.३० आणि दुपारी १.३० ते ३ च्या दरम्यान दोन सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी औसा तालुक्यातील किल्लारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक प्रशालेच्या केंद्रावर १६१ विद्यार्थ्यांची नोंद होती. या परीक्षेसाठी किल्लारी गावातील विविध शाळांचे तसेच कार्ला, कुमठा, शिरसल, येळवट, किल्लारी भाग- २, कुमठा तांडा आदी ठिकाणचे विद्यार्थी होते. परीक्षेसाठी विद्यार्थी प्रशालेत आले. मात्र, सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित बसण्याचीही सुविधा नव्हती. काही विद्यार्थ्यांना डेस्कवर तर काहींना फरशीवर बसविण्यात आले.
दरम्यान, परीक्षा केंद्रातील वर्गांची सकाळी सफाईही करण्यात आली नव्हती. त्यामुळे सर्वत्र धूळ दिसून येत होती. तसेच विद्यार्थ्यांसह तेथील बहुतांश शिक्षकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. याशिवाय, सॅनिटायझरचा वापरही करण्यात येत नव्हता. ही बाब एका पालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तक्रार करीत संताप व्यक्त केला. इतर पालकांनाही त्याची माहिती मिळाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, पालकांनी मुख्याध्यापक माधव भोसले व केंद्रप्रमुख बी. के. पाटील यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी चूक झाली असल्याचे सांगितले. सॅनिटायझरही उपलब्ध करण्यात आले नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक दिगंबर गावकरे आदी उपस्थित होते. पालकांचा संताप पाहून तेथील कर्मचाऱ्यांनी मास्क व सॅनिटायझर विकत आणून विद्यार्थ्यांना दिले.
सकाळी सफाई नाही...
परीक्षा सुरू होण्यापूर्वी शाळेची सफाई करणे आवश्यक होते. परंतु, सेवक आजारी असल्याने सफाई करण्यात आली नाही, असे केंद्रीय मुख्याध्यापक गावकरे यांनी सांगितले.
तत्काळ सूचना करू...
शाळेत स्वच्छता करणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. यासंदर्भात माहिती घेऊन तत्काळ केंद्रप्रमुखांना सूचना करण्यात येत असल्याचे गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी यांनी सांगितले.