कमालपूर शिवारात शाळकरी मुलाची हत्या, उजनी आराेग्य केंद्रात नातेवाइकांचा ठिय्या; दाेघा मित्रांवर संशय, एक ताब्यात

By राजकुमार जोंधळे | Updated: January 12, 2025 20:03 IST2025-01-12T20:03:07+5:302025-01-12T20:03:58+5:30

पाेलिसांनी सांगितले, कमालपूर येथे शनिवार, ११ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन मित्र रोजच्याप्रमाणे एकत्र आले. ते विजया विठ्ठल गिरी यांच्या शेतात गेले हाेते.

School boy murdered in Kamalpur Shivara, relatives at Ujani Health Center; Two friends suspected, one in custody | कमालपूर शिवारात शाळकरी मुलाची हत्या, उजनी आराेग्य केंद्रात नातेवाइकांचा ठिय्या; दाेघा मित्रांवर संशय, एक ताब्यात

कमालपूर शिवारात शाळकरी मुलाची हत्या, उजनी आराेग्य केंद्रात नातेवाइकांचा ठिय्या; दाेघा मित्रांवर संशय, एक ताब्यात

राजकुमार जाेंधळे / उजनी (जि. लातूर) : औसा तालुक्यातील कमालपूर शिवारात एका शाळकरी मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी समाेर आली. याप्रकरणी दाेघा मित्रांवर संशय असून, एकाला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रितेश रवींद्र गिरी (वय १४) असे मयत मुलाचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, कमालपूर येथे शनिवार, ११ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन मित्र रोजच्याप्रमाणे एकत्र आले. ते विजया विठ्ठल गिरी यांच्या शेतात गेले हाेते. दरम्यान, रितेश रवींद्र गिरी हाही या मुलासाेबत गेला हाेता. रात्र झाली तरी रितेश हा घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी रात्रभर शाेध घेतला असता, ताे आढळून आला नाही. अखेर कुटुंबीयांनी साेबत असलेल्या मित्रांपैकी एकाला दरडावून विचारणा केली असता त्याने घटनेची माहिती देताना सांगितले की, रितेश गिरी याला आम्हीच जिवे मारून त्याचा मृतदेह साेयाबीनच्या ढिगाऱ्याखाली पुरला आहे. हे ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी विजया गिरी यांच्या शेतातील साेयाबीनच्या ढिगाऱ्याकडे धाव घेतली. भादा पाेलिसांनाही माहिती देण्यात आली. पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. साेयाबीनचा ढिगारा बाजूला केल्यानंतर रितेश गिरी या शाळकरी मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत.

पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, उजनी आराेग्य केंद्रात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी आक्राेश करीत गुन्ह्यातील आराेपींना अटक करावी, या मागणीसाठी आराेग्य केंद्रातच ठिय्या मांडला. शिवाय, भादा पाेलिस ठाण्याचे सपाेनि. राहुलकुमार भाेळ यांना घेरावही घातला.

कमालपूर, उजनीमध्ये बंदाेबस्त...

घटनेचे गांभीर्य ओळखून कमालपूर आणि उजनी आराेग्य केंद्रात राज्य राखीव दलाच्या तुकड्या, भादा ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय, औसा डीवायएसपी कुमार चाैधरी यांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली.

तपासानंतरच कारणांचा उलगडा...

कमालपूर येथील १४ वर्षीय शाळकरी मुलाचा खून करण्यात आला असून, यातील संशयित मित्रांपैकी एकाला पाेलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. खून नेमक्या काेणत्या कारणासाठी करण्यात आला याचा पाेलिस शाेध घेत आहेत. तपासानंतरच कारणांचा उलगडा हाेणार आहे. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर 

Web Title: School boy murdered in Kamalpur Shivara, relatives at Ujani Health Center; Two friends suspected, one in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.