कर्नाटकात आजपासून शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:24 AM2021-09-06T04:24:17+5:302021-09-06T04:24:17+5:30
भालकी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने शाळा बंद ठेवल्या होत्या. दरम्यान, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सोमवारपासून इयत्ता ...
भालकी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने शाळा बंद ठेवल्या होत्या. दरम्यान, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सोमवारपासून इयत्ता ६ ते ८ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आजपासून शाळा गजबजणार आहेत.
कर्नाटक राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. सध्या काेरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य शासनाने सोमवारपासून राज्यातील सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांचे वर्ग भरण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारपासून सकाळी १० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत वर्ग भरणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक दिवसाआड शाळा सुरू राहणार आहेत. त्यासंदर्भात शाळांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. फिजिकल डिस्टन्स राखण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शाळा संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करूनच सुरू करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेत येताना घरातून जेवणाचा डबा आणि पिण्यासाठी कोमट पाणी आणणे आवश्यक आहे.
आठवड्यातील सोमवार ते शुक्रवारपर्यंत पाच दिवस शाळा सुरू राहणार असून शनिवारी व रविवारी शाळेला सुटी राहणार आहे. सुटीच्या दोन दिवसांत शाळेत निर्जंतुकीकरण मोहीम राबविणे बंधनकारक आहे. प्रत्येक वर्गात १५ ते २० विद्यार्थी असणे आवश्यक असून एका बेंचवर एक विद्यार्थी बसण्याची व्यवस्था मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकांनी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सहमतीपत्र बंधनकारक...
दीड वर्षांनंतर शाळा सुरू होणार असल्याने शिक्षक, विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, शाळेत येताना विद्यार्थ्यांनी पालकांचे सहमतीपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. त्याशिवाय शाळेत प्रवेश दिला जाणार नाही, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.