आरक्षणासाठी लातुरात शाळा, महाविद्यालये, क्लासेस शंभर टक्के बंद!

By आशपाक पठाण | Published: September 9, 2023 06:09 PM2023-09-09T18:09:55+5:302023-09-09T18:10:46+5:30

मराठा आरक्षण : कडकडीत बंद, उपोषण सुरू

Schools, colleges, classes are closed one hundred percent in Latur for Maratha Reservation | आरक्षणासाठी लातुरात शाळा, महाविद्यालये, क्लासेस शंभर टक्के बंद!

आरक्षणासाठी लातुरात शाळा, महाविद्यालये, क्लासेस शंभर टक्के बंद!

googlenewsNext

लातूर : मराठा समाजास सरसकट कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी लातूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी पुकारण्यात आलेल्या बंदला शहर व जिल्हाभऱात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळांची घंटा वाजली नाही. तसेच महाविद्यालये व शिकवणी वर्गातही दिवसभर शुकशुकाट दिसून आला. आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित बंदबाबत शहर व जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, तसेच शिकवणी वर्ग संचालकांची मराठा क्रांतीच्या समन्वयकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या बंदबाबत विनंतीपत्र देऊन अवगत केले होते. 

समाजासाठी आरक्षणाचा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा व जीवनमरणाचा बनला असून, या पार्श्वभूमीवर बंदसाठी आपण सहकार्य करावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. विशेष म्हणजे विद्यार्थी वाहतूक संघटनांनाही असा आर्जव करण्यात आला होता. सर्वांनीच या विनंतीचा आदर करीत आपापली शाळा-महाविद्यालये बंद ठेवली. यामुळे बंदसाठी वेगळ्या प्रयत्नांची कसलीच गरज भासली नाही. अनेक शाळांनी विद्यार्थी व पालकांना शाळा बंद राहणार असल्याची पूर्वकल्पना दिली होती. या बंदबाबात समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणात संदेश झळकाविण्यात आले होते. विद्यार्थी वाहतूक संघटनांनीही वाहने रस्त्यांवर आणली नाहीत. सर्वच शाळा-महाविद्यालयांत शुकशुकाट दिसून आला. एरवी विद्यार्थ्यांनी गजबजलेला खाजगी शिकवणी (ट्युशन) परिसर निर्मनुष्य होता. असाच माहोल सर्व शैक्षणिक संस्थांत दिसत होता. एकंदरीत योग्य नियोजन व विनम्रता केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेले हे आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले. केलेल्या सहकार्याबद्दल मराठा क्रांतीच्या वतीने सर्व शिक्षणसंस्था, शिकवणीवर्ग संचालक, विद्यार्थी वाहतूक संघटना विद्यार्थी व पालकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

खासगी शिकवणी परिसरात शुकशुकाट...

लातूर शहरातील उद्योग भवन परिसरात खासगी शिकवणीवर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या भागात दिवसभर हजारो विद्यार्थ्यांची वर्दळ असते. मात्र, शनिवारी बंद पुकारण्यात आल्याने या भागात शुकशुकाट होता. कुठेही वर्ग भरले नाहीत. शिवाय, शाळा, महाविद्यालयांनीही बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला.
 

 

Web Title: Schools, colleges, classes are closed one hundred percent in Latur for Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.