लातूरच्या ‘उमंग ऑटिझम सेंटर’ला स्कॉच पुरस्कार; दिव्यांग मुलांसाठीच्या उपक्रमाचा राष्ट्रीय गौरव

By हरी मोकाशे | Published: December 2, 2024 11:14 AM2024-12-02T11:14:30+5:302024-12-02T11:15:29+5:30

या पुरस्कारामुळे लातूर जिल्हा प्रशासनाने दिव्यांग मुलांसाठी राबविलेल्या उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

Scotch Award to Umang Autism Centre of Latur; National Award for Activities for Children with Disabilities | लातूरच्या ‘उमंग ऑटिझम सेंटर’ला स्कॉच पुरस्कार; दिव्यांग मुलांसाठीच्या उपक्रमाचा राष्ट्रीय गौरव

लातूरच्या ‘उमंग ऑटिझम सेंटर’ला स्कॉच पुरस्कार; दिव्यांग मुलांसाठीच्या उपक्रमाचा राष्ट्रीय गौरव

लातूर : जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या उमंग ऑटिझम ॲण्ड मल्टीडीसिबिलिटी रिसर्च सेंटरला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे डॉ. प्रशांत उटगे यांनी नवी दिल्ली येथील समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारामुळे जिल्हा प्रशासनाने दिव्यांग मुलांसाठी राबविलेल्या उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

‘स्कॉच अवॉर्ड’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी राज्यांकडून मूल्यांकन सादर करण्यात आले होते. चार टप्प्यातील मूल्यांकनात व्हिडिओ, पीपीटी, छायाचित्रे, केस स्टडी, विश्लेषकांमार्फत निवड, प्रकल्पाबाबत संबंधित तज्ज्ञांची मते आणि अंतिम टप्प्यात ऑनलाईन प्रदर्शनात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी प्रकल्पाविषयी माहितीचे सादरीकरण केले होते. त्यानुसार देशभरातील तज्ज्ञांनी उमंग ऑटिझम सेंटरची प्रकल्पाची पुरस्कारासाठी निवड केली.

लातुरातील शासकीय वसाहतीतील जिल्हा परिषद शाळेच्या जागेत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उमंग ऑटिझम सेंटर ॲण्ड मल्टीडिसिबिलिटी रिसर्च सेंटरची स्थापना करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला. तसेच विविध खाजगी संस्था, कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून हे केंद्र उभारणीस मदत केली.

८ हजार दिव्यांग मुलांवर उपचार...
या ठिकाणी स्वमग्नता, बहुविकलांगता, सेरेब्रल पाल्सी, बुध्द्यांकमापन, अति चंचलपणा यासारख्या दिव्यांगत्वावर उपचार करण्यासाठी तसेच अस्थिव्यंग बालकांना थेरपी देण्यासाठी विविध अद्यावत व सुसज्ज उपचार पद्धती उपलब्ध आहे. या सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत ऑक्युपेशनल थेरपी, फिजोओथेरपी, स्पीच थेरपी आदींच्या मदतीने ७ हजार ९३६ दिव्यांग मुलांवर उपचार करण्यात आले आहेत.

महागडी उपचार पध्दती लातुरात स्वस्तात...
अशा प्रकारचे ऑटिझम सेंटर केवळ मुंबई, पुणे, हैदराबाद यासारख्या मोठ्या शहरांत असून तेथील उपचारपद्धती अतिशय महागड्या असतात. परंतु, उमंगच्या माध्यमातून येथे या सर्व उपचार पद्धती अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’मध्ये स्थापन झालेले केंद्र अत्यंत उत्कृष्टपणे कार्यरत आहे.

हा पुरस्कार सर्वांसाठी प्रेरणादायी : जिल्हाधिकारी...
उमंग ऑटिझम सेंटरला राष्ट्रीय स्तरावरचा ‘स्कॉच अवार्ड’ मिळाला असून जिल्हा प्रशासन, सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिव्यांग मुलांसाठी सुरु असलेल्या कामाची ही पावती आहे. अधिकाधिक दिव्यांग मुलांवर उपचार व्हावेत, त्यांच्यातील दिव्यांगत्वाचे वेळीच निदान व्हावे, यासाठी ‘ऑटिझम सेंटर ऑन व्हिल’ ही संकल्पना राबविली जात आहे. या सेंटरशी जोडले गेलेल्या प्रत्येकासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी आहे.
- वर्षा ठाकूर- घुगे, जिल्हाधिकारी.
 

Web Title: Scotch Award to Umang Autism Centre of Latur; National Award for Activities for Children with Disabilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.