लातुरात हिवाळ्यात पाण्यासाठी पायपीट; आणखी एक प्रकल्प जोत्याखाली, दाहकता वाढली

By हरी मोकाशे | Published: December 13, 2023 05:27 PM2023-12-13T17:27:39+5:302023-12-13T17:28:39+5:30

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली; अधिग्रहणासाठी १५ गावांचे प्रस्ताव

Search of water in winter in Latur; With another project under limit, inflammation flared up | लातुरात हिवाळ्यात पाण्यासाठी पायपीट; आणखी एक प्रकल्प जोत्याखाली, दाहकता वाढली

लातुरात हिवाळ्यात पाण्यासाठी पायपीट; आणखी एक प्रकल्प जोत्याखाली, दाहकता वाढली

लातूर : गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली आहे. आणखी एका प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के झाल्याने टंचाईची समस्या वाढू लागली आहे.

गत पावसाळ्यात विलंबाने पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला होता. पिकांपुरता पाऊस झाल्याने खरिपातील पिके चांगली उगवली होती. परंतु, ऑगस्टमध्ये जवळपास महिनाभरापेक्षा अधिक दिवस पावसाने ताण दिला. परिणामी, खरिपातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. अल्प पावसामुळे जिल्ह्यातील मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह रेणा, तिरू या नद्याही वाहिल्या नाहीत. त्याबरोबर नालेही खळाळले नाही. त्यामुळे विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही.

जिल्ह्यात दरवर्षी परतीचा पाऊस होतो. मात्र, यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत प्रशासनाने ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी ४ कोटी २९ लाखांचा टंचाई निवारण आराखडा केला. दरम्यान, नोव्हेंबर अखेरीसपासून पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

व्हटी, तिरू, तावरजा जोत्याखाली...
दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या वाढत आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांपैकी रेणापूर तालुक्यातील व्हटी आणि उदगीर तालुक्यातील तिरू या दोन मध्यम प्रकल्पांतील जलसाठा यापूर्वीच जोत्याखाली गेला आहे. आता लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामुळे तीन मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठाच नाही.

मध्यम प्रकल्पात २६ दलघमी जलसाठा...
जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पांत एकूण २६.०३७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात रेणापूर मध्यम प्रकल्पात ३.८८२, देवर्जन - ३.४६९, साकोळ- ४.९२०, घरणी- ६.७६७, मसलगा- ६.६९९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तावरजा, व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक पाणीसाठा...
प्रकल्प - टक्केवारी
तावरजा - ००
व्हटी - ००
रेणापूर - १८.८९
तिरू - ००
देवर्जन - ३२.४८
साकोळ - ४४.९४
घरणी - ३०.१२
मसलगा - ५१.४७
एकूण - २१.३१

तलावात २३.९० टक्के साठा...
लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत एकूण १३४ तलाव आहेत. या तलावात प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा ७५.१०७ दलघमी आहे. त्याची टक्केवारी २३.९९ अशी आहे. दरम्यान, दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत असल्याने प्रशासनाने जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केले आहेत.

१५ गावांत पाणीटंचाईच्या झळा...
डिसेंबरमध्येच जिल्ह्यातील १२ गावे आणि तीन वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या गावांनी १८ विहिरी, कूपनलिका अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. पंचायत समितीने पाहणी करून पाच गावांचे प्रस्ताव तहसीलकडे सादर केले आहेत. त्यात लातूर- १, औसा - २, अहमदपूर -१, शिरुर अनंतपाळ तालुक्यात एका गावचा प्रस्ताव असल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.

Web Title: Search of water in winter in Latur; With another project under limit, inflammation flared up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.