हृदयद्रावक! भावाला बुडताना पाहून दोघे मदतीला धावले; प्रयत्न अपुरे पडल्याने तिघेही बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 04:41 PM2022-05-27T16:41:40+5:302022-05-27T16:43:02+5:30

जळकोटच्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील घटना; भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघा मुलांचा बुडून अंत

Seeing the brother drowning, the two rushed to help; All three drowned due to insufficient efforts | हृदयद्रावक! भावाला बुडताना पाहून दोघे मदतीला धावले; प्रयत्न अपुरे पडल्याने तिघेही बुडाले

हृदयद्रावक! भावाला बुडताना पाहून दोघे मदतीला धावले; प्रयत्न अपुरे पडल्याने तिघेही बुडाले

googlenewsNext

जळकोट (जि. लातूर) : विवाह समारंभासाठी आलेली तीन मुले पोहण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यात उतरली होती. तेव्हा लहान भाऊ बुडत असल्याचे पाहून मोठ्या भावाने व अन्य एकाने त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास लाळी खु. (ता. जळकोट) येथे घडली आहे.

एकनाथ हनुमंत तेलंगे (१५, रा. राजा दापका, जि. नांदेड), संगमेश्वर बंडू तेलंगे (१३) व श्याम उर्फ चिमा बंडू तेलंगे (१५, दोघेही रा. चिमेगाव, ता. कमलनगर) असे मयत तिघा मुलांची नावे आहेत. जळकोट तालुक्यातील लाळी खु. येथील तुळशीराम तेलंगे यांच्या मुलीचा विवाह शुक्रवारी होता. त्यासाठी चिमेगाव येथील बंडू तेलंगे व राजा दापका येथील हनुमंत तेलंगे यांचे कुटुंबिय आले होते. शुक्रवारी सकाळी गावातील विष्णूकांत तेलंगे (१८) व एकनाथ तेलंगे, संगमेश्वर तेलंगे व त्याचा सख्खा भाऊ श्याम उर्फ चिमा तेलंगे हे चौघे गावानजीकच्या तिरु नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते.

संगमेश्वर यास पोहता येत नव्हते. तरीही तो पाण्यात उतरला आणि पोहण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, तो बुडू लागल्याचे पाहून भाऊ श्याम व एकनाथ यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, संगमेश्वरने त्या दोघांच्या गळ्यास मिठी मारल्यामुळे तिघेही बुडू लागले. तिघेही काही वेळात पाण्याबाहेर येतील म्हणून सोबतचा विष्णूकांत हा त्यांची प्रतीक्षा करीत होता. मात्र, ते तिघेही बुडाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे घाबरुन त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र, जवळ कोणीही नसल्याने त्याने गावाकडे धाव घेऊन कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना माहिती दिली.
गावकऱ्यांनी तात्काळ बंधाऱ्याकडे धाव घेऊन पाण्यात उडी घेऊन मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अपयशी ठरला. दरम्यान, काही जणांनी पोलीस प्रशासनास ही माहिती दिली. त्यावरुन तहसीलदार सुरेखा स्वामी, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व पोलीस निरीक्षक निशा पठाण यांनी उदगीरच्या अग्नीशमन दलास पाचारण केले.

दीड तास मुलांचा शोध...
गावातील महेश पाटील, संगमेश्वर देवशेट्टी, माधव मिरजगावे, हावगीस्वामी शिवम पाटील यांनी बंधाऱ्यात उतरुन मुलांचा शोध घेतला. पण मुले सापडली नाहीत. त्यामुळे अग्नीशमन दलातील विशाल गंडारे, रत्नदीप पारखे, अरबाज शेख, शिवा राडगे, माधव गोंड यांनी पाण्यात उडी घेऊन तब्बल दीड तास मुलांचा शोध घेतला. त्यानंतर तिन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

आई- वडिलांनी फोडला टाहो...
बंडू तेलंगे हे आपल्या पत्नीसह मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. या दुर्देवी घटनेत दोन्ही मुलांचा करुण अंत झाला. तसेच हनुमंत तेलंगे यांना एकुलता एक मुलगा होता. तोही मयत झाल्याने दोन्ही कुटुंबियांतील आई- वडिलांनी टाहो फोडला होता. त्यामुळे विवाह समारंभस्थळी शोककळा पसरली होती.

Web Title: Seeing the brother drowning, the two rushed to help; All three drowned due to insufficient efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.