जप्त केलेला ४० लाखांचा गुटखा चोरी प्रकरणात दोघे अटकेत; ३५ लाखांचा गुटखा अद्यापही गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 06:04 PM2022-01-22T18:04:13+5:302022-01-22T18:05:52+5:30
एका धाडसत्रात जप्त करुन ठेवलेला तब्बल ८४ लाखांपैकी ४० लाखांच्या गुटख्याची चाेरी झाली होती
लातूर : पाेलिसांनी एका धाडसत्रात जप्त करुन ठेवलेला तब्बल ८४ लाखांपैकी ४० लाखांच्या गुटख्याची चाेरी झाल्याचे प्रकरण समाेर आले आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात जवळपास १३ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दाेघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून साडेचार लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. शनिवारी त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, २५ जानेवारीपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत १० ऑक्टाेबर २०२१ राेजी सहायक पाेलीस अधीक्षक अनिकेत कदम यांच्या पथकाने धाड टाकून तब्बल ८४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला हाेता. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले हाेते. दरम्यान, एमआयडीसी पाेलीस ठाण्यातील अधिकारी, अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी गुरुवारी गाेदाम उघडले असता, जप्त केलेल्या मुद्देमालापैकी काही मुद्देमाल गायब असल्याचे आढळून आले. याची माेजदाद केली असता, जवळपास ४० लाखांचा गुटखा चाेरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
साडेचार लाखांचा गुटखा जप्त...
धाडसत्रामध्ये जप्त करण्यात आलेल्या गुटख्यापैकी तब्बल ४० लाख १५ हजारांच्या गुटख्याची चाेरी करणाऱ्या एकूण १३ आराेपीपैकी अहमदपूर येथील एक आणि अन्य ठिकाणच्या एकाला पाेलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्यांच्याकडून केवळ साडेचार लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अद्यापही ३५ लाखांच्या गुटख्याचा सुगावा पाेलिसांना लागला नाही.
१३ जणांविराेधात गुन्हा दाखल...
एमआयडीसी पाेलीस ठाण्यात राहुल कांबळे (रा. महादेवनगर, लातूर), इस्माईल कदम (रा. सिध्दार्थ साेसायटी, लातूर), समाधान कांबळे (रा. खाेरी गल्ली, लातूर), खमरउनिसा निळकंठे, नमा निळकंठे (रा. एमआयउीसी, लातूर), रंजना कांबळे (रा. महादेव नगर, लातूर), महेश बनसाेडे (रा. पंढरपूर जि. साेलापूर), किरण गाताडे (रा. महादेव नगर, लातूर), उमेश जाधव (रा. पंढरपूर, जि. साेलापूर), बाळकृष्ण गणे (रा. वसवाडी, लातूर), खादर शेख (रा. चाकूर) अजित घाेलप (रा. घाेलपवाडी, पुणे) आणि अहमदपूर येथील एक दुकानदार याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
- संजिवन मिरकले, पाेलीस निरीक्षक, लातूर