बंदी असलेली एक क्विंटल कॅरीबॅग जप्त; २७ आस्थापनांवर लातूर मनपाची कारवाई
By आशपाक पठाण | Published: November 28, 2023 06:37 PM2023-11-28T18:37:04+5:302023-11-28T18:37:21+5:30
बंदी असतानाही लातूर शहरात प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
लातूर : बंदी असतानाही लातूर शहरात प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरात जागोजागी कचऱ्यात जवळपास ७० टक्के कचरा प्लास्टिकचाच आढळून येत असताना मनपा प्रशासन गप्प आहे. यासंदर्भात लोकमतने २७ नोव्हेंबरच्या अंकात प्लास्टिक कॅरीबॅग बंदीचा फियास्को असे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत मनपा आयुक्तांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी मनपाच्या पथकाने २७ आस्थापनांवर कारवाई करीत जवळपास एक क्विंटल कॅरीबॅग जप्त केल्या आहेत.
कॅरीबॅग वापरास बंदी असतानाही अनेक ठिकाणी कॅरीबॅगचा सर्रास वापर होत असल्याचे लोकमतने निदर्शनास आणून दिल्यानंतर मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे,स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक सिद्धाजी मोरे, अक्रम शेख, सुरेश कांबळे, हिरालाल कांबळे, अमजद शेख, प्रदीप गायकवाड, गजानन सुपेकर, शिवराज शिंदे, प्रल्हाद शिंदे, धनराज गायकवाड, देवेंद्र कांबळे, श्रीकांत शिंदे यांनी मोहीम हाती घेतली. गंजगोलाई, रयतू बाजार,गांधी मार्केट, राजीव गांधी चौक या भागात विविध विक्रेत्यांवर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी अनेक ठिकाणी प्रतिबंधित कॅरीबॅग आढळून आल्या. कॅरीबॅग विक्री करणाऱ्या अथवा कॅरीबॅग मधून साहित्याची विक्री करणाऱ्या २७ स्थापनांवर यावेळी कारवाई करण्यात आली. यात ९७ किलो कॅरीबॅग जप्त करून ३३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गंजगोलाई भागात महादेव फिस्के, सुनिल कांबळे, रवी शेंडगे, दत्ता पवार, निलेश शिंदे, महादेव धावारे, रहीम सय्यद यांनी कारवाई केली.
किराणा दुकान, फळ, भाजीपाला विक्रेतेच रडारवर...
महापालिकेच्या पथकाने मंगळवारी प्लास्टिक कॅरीबॅग विक्रेत्यांवर कारवाई केली. यात किराणा दुकान, फळ, भाजीपाला विक्रेत्यांचा समावेश आहे. जिथे निर्मिती होते, जे व्यापारी गोदामे भरून बंदी असलेल्या कॅरीबॅगची विक्री करतात त्यांच्यावर कारवाई करणार कोण, असा सवाल किरकोळ विक्रेत्यांनी केला आहे.
कापडी पिशवीचा वापर करावा...
फळ व भाजीपाला तसेच इतर विक्रेत्यांनी कॅरीबॅगचा वापर करू नये. कॅरीबॅगचा वापर केल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे. शिवाय, नागरिकांनीही खरेदीसाठी बाहेर पडत असताना कापडी पिशवी सोबत न्यावी. कॅरीबॅगचा आग्रह करू नये. प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा, असे आवाहनही करण्यात आले.