रस्ता कामासाठी लोदग्याच्या सरपंचाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनीच घेतले ताब्यात
By आशपाक पठाण | Published: March 5, 2024 06:39 PM2024-03-05T18:39:43+5:302024-03-05T18:40:39+5:30
लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना
लातूर :महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आलेल्या लातूर ते निटूर मोड, औराद शहजानी मार्गावरील रस्त्याचे काम अर्धवट व अनेक ठिकाणी निकृष्ट करण्यात आल्याचा आरोप करीत लोदगा ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग गोमारे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्यांना ताब्यात घेतले.
लातूर ते निटूर, औराद शहाजानी राज्य मार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. काही ठिकाणी केलेले काम अत्यंत दर्जाहीन झाले आहे. यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. या मार्गाचे काम करणारे कंत्राटदार व अभियंता यांच्यावर मनुष्यवधानाचे गुन्हे दाखल करून कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाका, अशी मागणी करीत सरपंच पांडुरंग गोमारे यांनी जवळपास आठ दिवस उपोषण केले होते. त्यांना ८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे कार्यकारी अभियंता यांनी लेखी पत्र देऊ दीड महिन्यात काम सुरू करून उर्वरित कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. तसेच औसा तहसीलदारांनीही आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले होते. दीड महिना लोटला, आता विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप गोमारे यांनी मंगळवारी केला आहे.
साध्या वेशातील पोलिसांनी घेतले ताब्यात...
सरपंच पांडुरंग गोमारे यांनी १ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लेखी आश्वासनाची पुर्तता न केल्यास ५ मार्च रोजी आत्मदहन करणार असल्याचे म्हटले होते. मंगळवारी दुपारी १२ वजाण्याच्या सुमारास एका वाहनातून उतरून डिझेलचा कॅन अंगावर ओतून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या गोमोर यांना साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह एमआयडीसी पोलिस होते.