लातूर पालिकेकडून ३ हजार ६५ पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर निधी; अशी आहे अर्जाची प्रक्रिया

By हणमंत गायकवाड | Published: September 29, 2023 01:52 PM2023-09-29T13:52:18+5:302023-09-29T13:52:33+5:30

महिला बचत गटांनाही व्यवसायासाठी खेळते भांडवल

Self-sustaining funds for 3 thousand 65 street vendors from Latur Municipal Corporation | लातूर पालिकेकडून ३ हजार ६५ पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर निधी; अशी आहे अर्जाची प्रक्रिया

लातूर पालिकेकडून ३ हजार ६५ पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर निधी; अशी आहे अर्जाची प्रक्रिया

googlenewsNext

लातूर : महानगरपालिकेअंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामार्फत लातूर शहरातील पथविक्रेत्यांचा सर्व्हे करण्यात आला असून ५ हजार ५६५ जणांची नोंदणी झाली आहे. यापैकी ३ हजार ७९९ पथविक्रेत्यांना खेळते भांडवल म्हणून दहा हजारांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. दरम्यान, आता बचत गटातील महिलांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यानुसार त्यांचेही अर्ज स्वीकारले जात आहेत.

लातूर शहर महानगरपालिकाअंतर्गत पथविक्रेत्यांना निकषाप्रमाणे पात्र असलेल्या सर्व फेरीवाले, हातगाडीवाले, बचत गटातील सदस्य असलेल्या महिला व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतून खेळते भांडवल म्हणून दहा हजार रुपये कर्ज दिले जात आहेत. नाममात्र व्याजदराने एक वर्षाच्या परतफेडीच्या मुदतीसह ही योजना राबविली जात आहे. त्यासाठी महानगरपालिकेमध्ये अर्ज स्वीकारले जात आहेत. २०२० ते २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत ५ हजार ५६५ पैकी ३ हजार ७९९ जणांना कर्ज देण्यात आले आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये या पथविक्रेत्यांना अल्प व्याजदरात कर्ज म्हणून वितरित करण्यात आले आहे. या निधीतून पथविक्रेत्यांचा छोटा मोठा व्यवसाय सुरू झाला आहे.

तीन कोटी ७९ लाख ९० हजार रुपये पीएम स्वनिधी
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत लातूर शहरातील तीन हजार ७९९ पपथविक्रेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयेप्रमाणे एकूण तीन कोटी ७९ लाख ९० हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. आणखी अर्ज घेणे सुरू आहे. आता महिला बचत गटातील पात्र सदस्यांनाही या योजनेत खेळते भांडवल दिले जाणार आहे.

५० हजार रुपयांपर्यंत खेळते भांडवल....
दहा हजार रुपये बारा महिन्याच्या परतफेडी करण्याच्या मुदतीत दिले जात आहेत. परतफेड केल्यानंतर पुन्हा १८ महिन्यांच्या मुदतीत वीस हजार रुपये दिले जातात. वीस हजारांची परतफेड केल्यानंतर २४ महिन्यांच्या मुदतीत परतफेड करण्याच्या अटीवर ५० हजार रुपये खेळते भांडवल कर्ज योजना आहे. या तिन्ही मुदत योजनेत पथविक्रेत्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती लातूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त शिवाजी गवळी यांनी दिली.

डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅक सुविधा
पथविक्रेत्यांनी डिजिटल व्यवहार केल्यास त्यांना कॅशबॅक सुविधा प्रोत्साहनपर मिळणार आहे. शहरातील सर्व ग्राहक सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्र येथून अर्ज करता येईल. शहर मनपाच्या अभियान कक्षातूनही अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
लाभार्थी लातूर शहरातील असावा.
मोबाईल क्रमांक जो आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक.
आधारकार्ड, स्वत:चे पासबुक, पॅनकार्ड, मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड आवश्यक.

Web Title: Self-sustaining funds for 3 thousand 65 street vendors from Latur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर