खेड्या-पाड्यात १० हजारात चोरीच्या दुचाकींची विक्री; दाेघांना पाेलिस पथकाने उचलले !
By राजकुमार जोंधळे | Published: May 6, 2023 06:55 PM2023-05-06T18:55:00+5:302023-05-06T18:55:44+5:30
दुचाकी चाेरट्यांचा धुमाकूळ : दोघांकडून सात दुचाकी जप्त
लातूर : शहरासह जिल्ह्यात विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी, तीनचाकीसह चारचाकी वाहने पळविण्याच्या घटनांमध्ये अलीकडे माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकी चाेरणाऱ्या आणि त्याची दहा ते पंधरा हजारांत विल्हेवाट लावणाऱ्या टाेळीतील दाेघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दाेघेही औसा तालुक्यातील असल्याची माहिती समाेर आली असून, त्यांच्याकडून आतापर्यंत सात दुचाकी जप्त केल्या आहेत.
लातूर शहरातील शाळा-महाविद्यालय, क्लासेस परिसर आणि बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी पार्किंग केलेल्या दुचाकींवर या टाेळीची विशेष नजर आहे. वाहनधारक आपले वाहन पार्क करून गेल्यानंतर त्यांच्यावर नजर ठेवत दुचाकी पळविल्या जात आहेत. लातूर जिल्ह्यात दिवसाला किमान एक ते दाेन दुचाकी चाेरीच्या घटना घडत आहेत. याबाबत त्या-त्या पाेलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मात्र, चाेरट्यांचा सुगावा लागत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून टाेळीतील काही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता औसा तालुक्यातील दाेघा दुचाकी चाेरट्यांना पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या आहेत.
अनेक दुचाकींची लावली काही हजारात विल्हेवाट...
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून पळविण्यात आलेल्या वाहनांची काही हजारांमध्ये विल्हेवाट लावणारी टाेळी सक्रिय आहे. दुचाकी चाेरल्यानंतर काही वेळात तिचे पार्टस् काढून स्वतंत्र केले जातात. त्या पार्टसची विक्री केली जात असल्याचे समाेर आले आहे. तर वाडी-तांडे, खेड्या-पाड्यात केवळ दहा ते पंधरा हजारांत दुचाकीची विक्री करणारे रॅकेट सक्रिय आहे.
कमी पैशांत दुचाकी घेतली; पाेलिस चाैकशीत अडकले...
औसा तालुक्यातील खेड्यात एक नव्हे तब्बल दहा ते पंधरा जणांनी चाेरीच्या दुचाकी कमी दामात मिळत असल्याच्या लालसेतून घेतल्या आहेत. वाहन चाेरणाऱ्या टाेळीतील दाेघांना उचलल्यानंतर या दुचाकी खेरी करणाऱ्यांची नावे समाेर आली आहेत. आता त्यांचीही चाैकशी सुरु आहे. कमी दामात दुचाकी घेतले अन् पाेलिसांच्या चाैकशीत अडकले, अशीच काेंडी झाली आहे.