वृद्ध नागरिकांना घरपोच लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:19 AM2021-04-24T04:19:06+5:302021-04-24T04:19:06+5:30
महापालिकेच्या पथकाद्वारे ऑक्सिजन वापराची तपासणी लातूर : शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. त्यातच बेडची संख्या अपुरी पडत ...
महापालिकेच्या पथकाद्वारे ऑक्सिजन वापराची तपासणी
लातूर : शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. त्यातच बेडची संख्या अपुरी पडत आहे. महापालिकेच्या वतीने ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यानुसार, शहरात ऑक्सिजनच्या वापराबाबत निरीक्षण करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाद्वारे विविध खासगी रुग्णालयांना भेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे, तसेच त्रुटी आढळल्यास संबधित दवाखान्याला सूचना करण्यात येत आहेत.
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची तपासणी
लातूर : शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची आरोग्य विभागाच्या पथकाच्या वतीने तपासणी केली जात आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या वतीने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अनेक नागरिक कारण नसताना रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मनपा आणि आरोग्य विभागाच्या वतीने तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आह. यामध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांची थेट कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी केली जात आहे. नागरिकांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ॲन्टी कोरोना फोर्स उपक्रमाला प्रतिसाद
लातूर : शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, जिल्हा प्रशासनाच्या वतीने ॲन्टी कोरोना फोर्सची संकल्पना राबविली जात आहे. विविध गावांत पोलीस भरती, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले यामध्ये सहभागी होत आहेत. गावाच्या प्रवेशद्वारावर या तरुणांचा कडक पहारा असून, गावात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जात आहे, तसेच मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स आदी उपाययोजनाबद्दल माहिती दिली जात आहे. नागरिकांनी ॲन्टी कोरोना फोर्सला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वाध्याय उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग
लातूर : कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. त्यातच शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, तरीही अनेक विद्यार्थी स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून आपला अभ्यास करीत आहेत. जिल्ह्यात जवळपास ३२ हजार २०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली आहे. त्या तुलनेत २२ हजार १०० विद्यार्थी प्रत्यक्ष या उपक्रमात सहभागी आहेत. शिक्षण विभागाच्या वतीने या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
कोविड रुग्णांना योगसनाचे धडे
लातूर : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा आलेख उंचावत आहे. त्यातच प्रशासनाच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार, एमआयडीसी परिसरातील १२ नंबर पाटी येथे एक हजार मुला-मुलींचे वसतिगृह येथे कोविड केअर सेंटर कार्यान्वित आहे. येथे जवळपास ७०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांचा योगासनाचे धडे सकाळच्या सत्रात दिले जात आहेत, तसेच इतर व्यायामही करून घेतला जात आहे. त्यामुळे रुग्णांची प्रकृती लवकर बरी होण्यास मदत होत असून, प्रतिकारशक्ती वाढत आहे. परिणामी, रुग्णांमधून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
स्वामी विवेकानंद स्कूलचा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
लातूर : स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश सीबीएसई स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रमाचा उपक्रम राबविला जात आहे. यशस्वितेसाठी प्राचार्य सच्चिदानंद जोशी, उपप्राचार्य आशा जोशी आदींसह शिक्षक परिश्रम घेत आहेत. या वर्गाद्वारे ऑनलाइन अभ्यास घेतला जात आहे. या उपक्रमाचे संस्थाध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, सचिव तथा माजी जि.प.अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, रंजितसिंह पाटील कव्हेकर, समन्वयक निळकंठराव पवार, संभाजीराव पाटील, विनोद जाधव, चंद्रशेखर जाधव आदींनी कौतुक केले आहे.
सामाजिक संस्थांच्या वतीने जनजागृती मोहीम
लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थाच्या वतीने कोरोना जनजागृती मोहीम राबविली जात आहे. त्या अंतर्गत समाजमाध्यमामध्येही जनजागृती केली जात आहे. मास्कचा नियमित वापर, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर, गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळावे आदी प्रकारचे संदेश दिले जात आहेत, तसेच विविध व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश दिला जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक संस्थामध्ये काम करणाऱ्या युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. नागरिकांनी आपली आणि कुटुंबांची काळजी घ्यावी, असे आवाहन सामाजिक संस्थाच्या वतीने करण्यात आले आहे.
लसीकरण मोहिमेला ग्रामीण भागात प्रतिसाद
लातूर : कोरोना लसीकरण मोहिमेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आराेग्य विभागाच्या वतीने प्राथमिक केंद्र स्तरावर लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार, ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांपुढील नागरिक लसीकरण करून घेत आहे. जिल्ह्यात १ मेपासून १८ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यानुसार, आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांनी तत्काळ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.