स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
By संदीप शिंदे | Published: January 9, 2024 07:09 PM2024-01-09T19:09:50+5:302024-01-09T19:10:03+5:30
उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
उदगीर : तालुक्यातील वाढवणा येथील आरोपीने ३ मे २०१८ रोजी राहत्या घरी स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. घडलेला प्रकाराची माहिती पीडित मुलीने आईला सांगितल्यावर वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीस मंगळवारी उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.डी. सुभेदार यांनी जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
घटनेतील आरोपीने ३ मे २०१८ रोजी राहत्या घरी आपल्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. आरोपीने केलेल्या कृत्याची माहिती पीडितेच्या आईला पीडितेकडून मिळाल्यानंतर तिने वाढवणा पोलिस ठाण्यात तकार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून कलम ३७६ (२) व सहकलम ३, ४, ५ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करून तपास पोलिस उपनिरीक्षक पी. जी. शिरसे यांनी केला. सहायक पोलिस निरीक्षक जी. के. शेख यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
उदगीर येथील अति. जिल्हा सत्र न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी होऊन, सरकार पक्षाच्या वतीने ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांच्या साक्षीपुराव्यांवर व कागदपत्रांवरती तसेच सहा. सरकारी वकील शिवकुमार गिरवलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी आरोपीस सश्रम जन्मठेपेची व एक लाख रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून ॲड. शिवकुमार गिरवलकर यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी सपोउपनि आर. पी. शेख यांनी सहकार्य केले. तत्कालीन तपासिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर गुन्हा नोंद झाल्यानंतर उदगीर येथील सजग नागरिकांनी आरोपीस कठोर शासन होण्यासाठी मेणबत्ती मोर्चा काढून आक्रोश व्यक्त केला होता. या निकालामुळे पीडितेस न्याय मिळाल्याची जनभावना उदगीरमध्ये व्यक्त होत आहे.