पुण्यात झाली जन्मठेपेची शिक्षा; जामिन भेटताच लातूरला येताना घेऊन आला पिस्टल
By राजकुमार जोंधळे | Published: June 17, 2024 07:28 PM2024-06-17T19:28:42+5:302024-06-17T19:29:21+5:30
पोलिसांनी तरुणाकडून जिवंत काडतूस, मॅगझिन जप्त
लातूर : पिस्टल, दाेन जिवंत काडतूस आणि मॅगझिनसह एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साेमवारी अटक केली. आठवड्यात केलेली शस्त्र जप्तीची ही कारवाई दुसरी आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे साेमवारी औसा-तुळजापूर महामार्गावरील चिंचोली येथे पाण्याच्या टाकीनजीक थांबलेल्या एकाला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेऊन चौकशी केली असता, महेश दिनकर कुलकर्णी (वय ३०, रा. टाका, ता. औसा) असे त्याने नाव सांगितले. त्याच्याकडून एक पिस्टल, दाेन जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त करण्यात आले आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. विश्वंभर पल्लेवाड, पोउपनि. संजय भोसले, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली आहे.
पुण्यात झाली जन्मठेप; गावी आल्यावर अटक...
पाेलिसांनी अटक केलेला महेश दिनकर कुलकर्णी हा सध्या पुणे शहरात वास्तव्याला आहे. त्याच्याविराेधात सिंहगड रोड, पुणे पाेलिस ठाण्यात गुरनं. ०५/२०१५ कलम ३०२ भादंविसह, ४/२५ शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल असून, यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सध्या तो जामिनावर बाहेर असून, गावाकडे आला हाेता. यावेळी लातूर पाेलिसांनी त्याला अटक केली.