गरज सराे अन् वैद्य मराे! ८८ कंत्राटी चालकांच्या सेवेस एसटी महामंडळाकडून अचानक ब्रेक
By राजकुमार जोंधळे | Published: September 12, 2022 06:52 PM2022-09-12T18:52:10+5:302022-09-12T18:52:24+5:30
या आदेशाने कंत्राटी चालकांच्या राेजीराेटीवरच गंडांतर आले आहे.
लातूर : एसटीच्यालातूर विभागात भरती करण्यात आलेल्या एकूण ८८ कंत्राटी चालकांची सेवा सप्टेंबर महिन्यापासून थांबविण्यात आली आहे. परिणामी, याबाबतचे आदेश महामंडळाने काढले आहेत. या आदेशाने कंत्राटी चालकांच्या राेजीराेटीवरच गंडांतर आले आहे. दरम्यान, एका फटक्यात ८८ चालकांना आता ब्रेक देण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी कामगारांनी जवळपास सहा महिन्यांचा संप पुकारला हाेता. या काळात एसटी महामंडळाने कंत्राटी चालकांना खाजगी एजन्सीच्या शिफारसीने कामगारांची नियुक्ती करण्यात आली हाेती. ३ सप्टेंबर राेजी अचानक ब्रेक देण्यात आलेले ८८ कंत्राटी एसटी चालक गाेंधळून गेले आहेत. या कंत्राटी चालकांनी बाहेरगावच्या नाेकऱ्या साेडून एसटीतील सेवा स्वीकारली हाेती. कंत्राटी ८८ चालकांनी ऐन संपकाळात प्रवाशांना प्रवासाची सुविधा दिली. विशेषत: एसटीच्या प्रतिकूल परिस्थितीत ताेकड्या मानधनावर काम करण्यास हे कंत्राटी चालक तयार झाले. कायम करावे अशीही त्यांची मागणी नव्हती. मात्र, वरिष्ठांच्या पत्रानुसार या कंत्राटी चालकांची अचानक सेवा थांबविल्याने गाेंधळ उडाला आहे.
१०० कंत्राटी चालकांना मंजुरी...
महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपाच्या काळात कंत्राटी तत्त्वावर एसटी चालकांची भरती करण्याला परिवहन महामंडळाने मंजुरी दिली हाेती. यासाठी एका खाजगी एजन्सीची नियुक्तीही करण्यात आली हाेती. लातूर विभागाला एकूण १०० चालकांची भरती करण्याबाबतचा निर्णय झाला हाेता. दरम्यान, यातील टप्प्याटप्प्यात ८८ चालकांची नियुक्ती करण्यात आली. या चालकांनी जवळपास सहा महिने सेवा बजावली आहे. आता त्यांना अचानक ब्रेक दिल्याने अडचण झाली आहे.
काम सराे अन् वैद्य मराे...
ज्या काळात महामंडळ अडचणीत हाेते, बहुतांश कामगार, चालक-वाहकांनी कामबंद आंदाेलन पुकारले हाेते, अशा काळात एसटीचा गाडा चालावा यासाठी कंत्राटी चालकांच्या भरतीचा निर्णय घेतला गेला. याला खाजगी चालकांनी माेठा प्रतिसाद दिला. त्यातील ८८ जणांची निवडही झाली. काही काळानंतर कामगारांचा संप मिटला आणि कंत्राटी चालकांची गरज संपली. यातूनच आता ८८ कंत्राटी चालकांना ब्रेक दिला आहे. ‘काम सराे अन् वैद्य मराे...’ अशीच स्थिती आहे. - कंत्राटी चालक