नागरी आरोग्य केंद्रातही मिळणार आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा
By हरी मोकाशे | Published: October 27, 2023 07:50 PM2023-10-27T19:50:54+5:302023-10-27T19:51:07+5:30
गोरगरिबांना दिलासा : उदगीरमध्ये पॉलिक्लिनिक सेवा सुरू
लातूर : झोपडपट्टी, आर्थिक मागास, मजूर वस्तीतील रुग्णांच्या आजाराचे तत्काळ निदान होऊन वेळेवर उपचार मिळावेत म्हणून उदगीरमधील तळीवेस भागात पॉलिक्लिनिक सेवा सुरु करण्यात आली आहे. तिथे सहा आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर आठवड्यातून एक दिवस आरोग्य सेवा देणार आहेत.
उदगीर शहरात दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, दोन वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील आरोग्य सेवा दिल्या जातात. दरम्यान, जिल्ह्यातील दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा उंचावून तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सुविधा देण्याच्या सूचना राज्य शासनाने केल्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि उदगीरमधील तळीवेस भागात पॉलिक्लिनिक सेवेस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय महिंद्रकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमन येनालडले, डॉ. भोसले, डॉ. पवार, डॉ. मुसणे आदी उपस्थित होते.
स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ करणार तपासणी...
उदगीरमधील तळीवेस भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा उंचावण्यात आला आहे. तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवांबरोबरच गंभीर आजाराचे लवकर निदान व्हावे म्हणून सहा तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, कान- नाक- घसा तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ, मानसोपचार, त्वचारोग तज्ज्ञ आहेत. ते आठवड्यातून एक दिवस रुग्णांची तपासणी करुन उपचार करणार आहेत.
लवकर निदान होण्यास मदत...
तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती ही स्त्री रुग्णालय, सामान्य रुग्णालय, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात असते. आता उदगीरच्या तळीवेस भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातही सहा तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना तत्काळ सेवा मिळण्यास मदत होणार आहे. शिवाय, सामान्य रुग्णालयावरील काहीसा ताण कमी होणार आहे. या केंद्रातून संदर्भसेवाही पुरविण्यात येणार आहेत. सामान्य रुग्णांसाठी हे हक्काचे क्लिनिक असणार आहे.
- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.