लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासह दहा तहसीलमध्ये सेतू सुविधा केंद्र
By आशपाक पठाण | Published: February 18, 2024 07:59 PM2024-02-18T19:59:34+5:302024-02-18T20:00:10+5:30
मनमानी होणार बंद : जागा उपलब्ध करून देण्याचे तहसीलदारांना आदेश
लातूर: तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र बंद करण्यात आल्यानंतर महा ई सेवा केंद्र, आपले सरकार या सुविधा केंद्रात ऑनलाईन सुविधा अत्यल्प दरात प्रशासनाने उपलब्ध करून दिली. मात्र याठिकाणी मनमानी शुल्काच्या आकारणीमुळे आर्थिक लूट वाढल्याची ओरड होती. त्यामुळे आता लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासह १० तहसील कार्यालयात आपले सरकार सेवा केंद्र (सेतू सुविधा केंद्र) लवकरच सुरू होणार आहेत. जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू असताना याठिकाणी प्रशासकीय शुल्काव्यतिरिक्त आगाऊ रक्कम घेतली जात नव्हती. लाभार्थी रांगेत उभा असला की त्याच्याकडून निश्चित केलेले शुल्क घेऊन त्याला लागणारी उत्पन्न, रहिवासी, अधिवास आदी प्रमाणपत्रांचे अर्ज भरून घेतले जात होते. विशिष्ट मुदतीनंतर त्यांना प्रमाणपत्रही दिले जात होते. मात्र, हे सुविधा केंद्र बंद झाल्याने नागरिकांना महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्राचा आधार घ्यावा लागत होता. तहसीलच्या आवारात अनेकांनी ऑनलाईनची दुकाने थाटली. ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिकची रक्कम घेतल्याशिवाय अनेकजण कागदपत्रे हातातही घेत नव्हते. त्यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याची ओरड वाढली होती. यासंदर्भात लोकमतने १२ फेब्रुवारीच्या अंकात ' वयोवृध्दांसाठी अनुदान, फाईल करण्यासाठी दलाल कशाला' असे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी १५ फेब्रुवारी रोजी तहसीलदारांना पत्र पाठवून जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
तहसीलदारांना काढले पत्र...
लातूर, औसा, अहमदपूर, रेणापूर, चाकूर तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात एकात्मिक नागरीक सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जेएमके. इन्फोसॉफ्ट सोलूशन्स लि. व निलंगा, उदगीर, जळकोट,देवणी, शिरूर अनंतपाळला अहमदाबाद येथील गुजरात इन्फोटेक लि. कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भाचे कार्यारंभ आदेश ८ ऑगस्ट २०२३ मध्ये निघाले आहेत. दरम्यान, लोकमतच्या वृत्तानंतर जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना पत्र पाठवून सेतू सुविधा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना १५ फेब्रुवारीच्या पत्रात केल्या आहेत.
जागा उलब्ध, यंत्रणा लावण्याची गरज...
लातूर तहसील कार्यालयात जुन्या सेतू सुविधा केंद्राची जागा उपलब्ध आहे. याठिकाणी नवीन सेतू केंद्र उभारण्यासाठी सेट अप लावले की कामाला प्रारंभ होईल. मात्र, अद्याप आमच्याकडे कोणी आले नाही. कंपनीने काम सुरू केले की लागलीच वरिष्ठांना त्याबाबतचा अहवाल सादर केला जाईल. - सौदागर तांदळे, तहसीलदार, लातूर.