लातुरातील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील ६० फुटी रोडवरील सात दुकानांना भीषण आग
By हणमंत गायकवाड | Published: February 23, 2024 10:23 PM2024-02-23T22:23:09+5:302024-02-23T22:23:52+5:30
या दुकानांमध्ये गिफ्ट सेंटर, कुशनच्या दुकानांसह मोबाईल शॉपी, किराणा दुकानांचा समावेश आहे.
हणमंत गायकवाड, लातूर: सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील साळे गल्ली भागातील ६० फुटी रोडवरील दुकानांना शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळातच आगीचा भडका उडाला. त्यामुळे या भागातील फर्निचरच्या तसेच गिफ्ट सेंटर अशा एकूण सात दुकानांना आगीने वेढा दिला.
या आगित मोठे नुकसान झाले आहे.या दुकानांमध्ये गिफ्ट सेंटर, कुशनच्या दुकानांसह मोबाईल शॉपी, किराणा दुकानांचा समावेश आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तीन आगीच्या बंबसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग नियंत्रणात आणण्याचा अटोकाट प्रयत्न केला. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आग थोडी आटोक्यात आली. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. आगीचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस याचा तपास करीत आहेत. रात्री आग लागल्याने बचावकार्याला अडथळा येत होता.
मात्र, स्थानिक नागरिकांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आटोक्यात आणली. सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या ६० फुटी रोडलगत बरीच दुकाने आहेत. या दुकानांपैकी गिफ्ट सेंटर, दोन कुशनची दुकाने, मोबाईल शॉपी, पान टपरीसह किराणा दुकानाला आगीने वेढले. त्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला असून, यात मोठी हानी झाली असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी सुभाष कदम यांनी सांगितले.