चाकूरात एटीएम मशिनची चोरी करून सतरा लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:35 AM2021-02-18T04:35:20+5:302021-02-18T04:35:20+5:30
चाकूर शहरातील लातूर-नांदेड रस्त्यालगत त्रिमुर्ती चौकात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास तीन ते चार अज्ञात ...
चाकूर शहरातील लातूर-नांदेड रस्त्यालगत त्रिमुर्ती चौकात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास तीन ते चार अज्ञात व्यक्ती एटीएम मशिनची चोरी करत होते. तेव्हा शेजारी असलेल्या एका महिलेने आरडा ओरड केला. तरीही धाडसाने चोरट्यांनी एटीएम मशीन एका वाहनात टाकून पळ काढला. याची माहिती पोलीसांना मिळताच चाकूर व अहमदपुरच्या पोलीसांनी चोरट्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. तेव्हा अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव-सांगवी जवळील पुलाच्या खाली फोडलेल्या अवस्थेत एटीएम मशीन पोलिसांना आढळून आली. चोरट्यांनी त्यातील पैसे घेऊन पोलीसांना गुंगारा देत तेथून पळ काढला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी पाहणी केली. सुनेगाव सांगवी येथे एटीएम मशिन सापडलेल्या या ठिकाणी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले हाेते. याप्रकरणी सचिन चौधरी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. १६ लाख ७० हजार रूपयाची रक्कम चोरीला गेली असल्याची तक्रारीत नमूद असून या प्रकरणी अज्ञात तीन व्यक्ती विरोधात गुरनं ५२ / २१ कलम ३७९, ३४ भादंवि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पहाटे पासून पोलीस यंत्रणा याचा तपास करत असली तरी सायंकाळपर्यंत पोलीसांना आरोपींचा सुगावा लागला नाही. दरम्यान, गत काही दिवसांत चोरीच्या घटनेत वाढ झाली असून, याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.