दुखापतीवर मात करीत शैलेशने साधला डाव नॅशनल गेम्ससाठी निवड : महाराष्ट्राच्या निवड चाचणीत विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 03:39 PM2022-08-16T15:39:05+5:302022-08-16T15:41:01+5:30
पुणे येथे नुकत्याच ३६ व्या नॅशनल गेमसाठी निवड चाचण्या झाल्या, यात लातूरच्या शैलेश शेळकेने ९७ किलो वजनी गटात विजेतेपद पटकाविले.
महेश पाळणे
लातूर : उपमहाराष्ट्र केसरी तथा आंतरराष्ट्रीय मल्ल शैलेश शेळकेने पुण्याच्या सह्याद्री कुस्ती केंद्रात झालेल्या महाराष्ट्राच्या निवड चाचणीत कोल्हापूरच्या समीर देसाईचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. सहा महिने मैदानाबाहेर असलेल्या लातूर जिल्ह्यातील टाक्याच्या या मल्लाने पुनरागमण करीत आपल्या कौशल्याची प्रचिती दिली.
पुणे येथे नुकत्याच ३६ व्या नॅशनल गेमसाठी निवड चाचण्या झाल्या. यात लातूरच्या शैलेश शेळके ९७ किलो वजनी गटात ग्रिकोरोमन स्पर्धेत बाजी मारत विजेतेपद पटकाविले. अंतिम लढतीत कोल्हापुरच्या मल्लाला ३८ सेंकदात १०-०० ने पराभूत करीत प्रथम स्थान पटकाविले. या गटात राज्यातून १२ मल्ल्यांनी सहभाग नोंदविला. यातील सर्वच कुस्त्या जिंकत शैलेशने आपली ताकद दाखवून दिली. या जोरावर त्याची गुजरात येथे २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ३६ व्या नॅशनल गेमसाठी निवड झाली आहे. त्याला आर्मी स्पोर्टस इस्टीट्युटचे विनायक दळवी, शिवशंकर भावले, आंतराराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे प्रशिक्षक अर्जूनवीर काका पवार, गोविंद पवार यांनी मार्गदर्शन केले.
गुडघेदुखीमुळे होता महाराष्ट्र केसरीच्या मैदानाबाहेर...
यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत लातूरच्या शैलेश शेळकेने गुडघेदुखीमुळे माघार घेतली होती. ६ महिने सरावापासून दुर तसेच मैदानाबाहेर असलेल्या शैलेशने पुन्हा मेहनत घेत राज्याच्या निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स्लोव्हाकिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅडेट कुस्ती स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यासह काही वर्षांपुर्वी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तो उपविजेता होता.
राष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकाविणार...
गुडघेदुखीमुळे काही दिवसांपुर्वीच ऑपरेशन झाले होते. त्यामुळे सराव बंद होता. मात्र, त्यानंतर मेहनत घेत लयात येण्याचा प्रयत्न आहे. गुजरातच्या राष्ट्रीय स्पर्धेत नक्कीच सुवर्णपदक पटकाविणार. शैलेश शेळके, उपमहाराष्ट्र