शरद पवार भाजपला लातूरमध्ये धक्का देणार; माजी आमदाराच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 03:13 PM2024-07-09T15:13:23+5:302024-07-09T15:14:49+5:30

लातूर जिल्ह्यातील उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित झाल्याचे समजते.

Sharad Pawar set back for BJP in Latur the former MLA sudhakar bhalerao | शरद पवार भाजपला लातूरमध्ये धक्का देणार; माजी आमदाराच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

शरद पवार भाजपला लातूरमध्ये धक्का देणार; माजी आमदाराच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

NCP Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही यश मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर काही मतदारसंघात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी शरद पवार यांच्याकडून इतर पक्षाच्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच लातूर जिल्ह्यातील उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित झाल्याचे समजते. यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ११ जुलै रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत सुधाकर भालेराव हे हाती तुतारी घेतील, अशी माहिती आहे.

सुधाकर भालेराव यांनी लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच म्हणजेच ३ जून रोजी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगत होत्या. अखेर या चर्चेवर आता शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे असून ११ जुलै रोजी ते आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील.

भालेराव यांच्या पक्षांतराचं नेमकं कारण काय?

उदगीर विधानसभा मतदारसंघातून मागील निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांचा विजय झाला होता. ते सध्या महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीला भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महायुतीच्या माध्यमातून सामोरे जाण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर उदगीरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता असल्याने सुधाकर भालेराव यांना भाजपकडून संधी मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच भालेराव यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा मतदारसंघात रंगत आहे.
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अहमदपूरमधील भाजपचे माजी आमदार विनायक पाटील यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता भालेराव हेदेखील त्याच वाटेने जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Sharad Pawar set back for BJP in Latur the former MLA sudhakar bhalerao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.