किल्लारीत शरद पवारांचा शनिवारी कृतज्ञता सोहळा; लातूर, धाराशिवच्या भूकंपग्रस्तांचा पुढाकार
By आशपाक पठाण | Published: September 27, 2023 10:31 PM2023-09-27T22:31:36+5:302023-09-27T22:31:51+5:30
लातूर, धाराशिव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या वतीने शनिवारी किल्लारीच्या क्रांतीकारी मैदानात सकाळी १० वाजता डॉ.शरदचंद्र पवार यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती बुधवारी सक्षणा सलगर यांनी पत्रपरिषदेत दिली.
लातूर : ३० सप्टेंबर १९९३ च्या भूकंपानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन मदत कार्य सुरू केले. त्यांनी केलेल्या मदतीतून उतराई होण्यासाठी लातूर, धाराशिव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या वतीने शनिवारी किल्लारीच्या क्रांतीकारी मैदानात सकाळी १० वाजता डॉ.शरदचंद्र पवार यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती बुधवारी सक्षणा सलगर यांनी पत्रपरिषदेत दिली.
भूकंपात दहा हजारांच्या जवळपास लोकांनी आपले प्राण गमावले. लाखो लोक बेघर झाले, अनेक मुले अनाथ झाली. अनेकांनी आपले आई, वडील, पती, पत्नी, आजी, आजोबा, मुले गमावले. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. अशा परिस्थितीत भूकंपग्रस्त भागातील जनतेला आधार देण्यासाठी अवघ्या दोन तासात तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार धावून आले. भूकंपग्रस्त भागाच्या नवनिर्मितीसाठी त्यांनी स्वत: पुढाकार घेतला. जलदगतीने कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यामुळेच या भागात मूलभूत सुविधा मिळाल्या, त्यांच्या त्या कामातून उतराई होण्यासाठी हा कृतज्ञता सोहळा असल्याची माहिती विनाकराव पाटील कवठेकर, सुभाष पवार, अमर बिराजदार यांनी दिली. यावेळी संजय शेटे, राजा मणियार, नानाराव भोसले, बख्तावर बागवान आदींची उपस्थिती होती.
पक्षविरहित कार्यक्रम, मागणे काहीच नाही...
किल्लारीत होणारा हा कार्यक्रम पक्षविरहित आहे. कृतज्ञता सोहळ्यात हजारो लोक स्वत:हून उपस्थित राहणार आहेत. भूकंपाच्यावेळी मदत करणाऱ्या शासकीय अधिकारी, संस्थांचे यापूर्वी आभार मानले आहेत. त्यावेळी भूकंपग्रस्तांचे तारणहार शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा राहिला होता. आता या घटनेला ३० वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त सर्व भूकंपग्रस्तांच्या वतीने कृतज्ञता सोहळा आयोजिण्यात आला आहे. या कार्यक्रमात आम्ही कोणतीही मागणी करणार नाही, असे संयोजकांनी सांगितले.