शिवजयंती उत्सव; लातूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी
By राजकुमार जोंधळे | Published: February 19, 2023 09:04 PM2023-02-19T21:04:26+5:302023-02-19T21:04:33+5:30
खासदार सुधाकर शृंगारे यांचा पुढाकार
लातूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाेहळ्यानिमित्त पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी करत अनाेख्या पद्धतीने अभिवादन केले. यासाठी खा. सुधाकर शृंगारे यांनी पुढाकार घेतला. यंदा अनाेख्या पद्धतीने, विविध विधायक उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली.
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी उपस्थिती हजाराे शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ... जय शिवराय... यांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमला. यंदा उदगीर आणि अहमदपूर शहरातही अनाेख्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर निलंगा येथे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी करत शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला. या वेळी हजाराे शिवप्रेमी नागरिकांची उपस्थिती हाेती. निलंगा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला.
शिवकालीन शस्त्र अन गड
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर १५ ते १८ फेब्रुवारी राेजी शिवकालीन शस्त्रांचे, गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन झाले. १८ फेब्रुवारी राेजी सातारा येथील विक्रमसिंह पाटील यांचे व्याख्यान झाले.
लातूर शहरातही केली हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी...
लातूरचे खा. सुधाकर शृंगारे यांच्या वतीने यंदा शिवजयंतीनिमित्त आगळ्या-वेगळ्या उपक्रमांचे आयाेजन करत लक्ष वेधून घेण्यात आले. दरवर्षी खा. सुधाकर शृंगारे आपल्या कल्पनेतील महापुरुषांची जयंती साजरी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात. यापूर्वी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ७२ फुटी पुतळ्यावरही हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी केली हाेती. आता यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत लातुरात पूर्णाकृती पुतळ्यावरही रविवारी हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.