खेळाबरोबरच पेलले शैक्षणिक गुणवत्तेचे शिवधनुष्य; राष्ट्रीय खेळाडू वेदिका दळवेचे बारावीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 07:23 PM2023-05-25T19:23:22+5:302023-05-25T19:24:08+5:30
बेसबॉल व साॅफ्टबॉल खेळात किमया करणाऱ्या वेदिकाने अभ्यासातही आपली लय कायम ठेवली आहे.
- महेश पाळणे
लातूर : पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलाेगे कुदोगे तो बनेंगे खराब या उक्तीला फाटा देत लातूरच्या वेदिका महादेव दळवे हिने वाणिज्य शाखेतून इयत्ता बारावीत ९४.१७ टक्के गुण घेत अभ्यासाबरोबर खेळाची दुहेरी बाजू जपत शैक्षणिक गुणवत्तेचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे. दररोज चार तास मैदानावर सराव करणाऱ्या वेदिकाने नाण्याच्या या दोन्ही बाजू जपत आपला सिक्का खणखणीत ठेवला आहे.
औसा तालुक्यातील करजगाव येथील रहिवासी असलेली वेदिका लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात इयत्ता बारावी वाणिज्य विभागातून नुकतीच उत्तीर्ण झाली आहे. ६०० पैकी ५६५ गुण घेत तिने महाविद्यालयातून सहावा क्रमांक मिळविण्याचा बहुमान पटकाविला आहे. यामध्ये खेळाचे १५ ग्रेस गुणही तिला मिळाले आहेत. बेसबॉल व साॅफ्टबॉल खेळात किमया करणाऱ्या वेदिकाने अभ्यासातही आपली लय कायम ठेवली आहे.
अनेक पालक खेळामुळे अभ्यासावर परिणाम होईल, या भीतीने आपल्या पाल्यास मैदानावर पाठविण्यास धजावतात. मात्र, वेदिकाच्या आई-वडिलांनी तिला खेळासाठीही स्वातंत्र्य दिले होते. याचे सार्थक करीत वेदिकाने जीवनातील शारीरिक व बौद्धिक बाजू जपत हे दुहेरी यश मिळविले. एकंदरीत वेदिकाच्या या यशाचे क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे. तिला खेळासाठी प्रशिक्षक दैवशाला जगदाळे, प्रा. अनिरुद्ध बिराजदार, प्रा. रत्नराणी कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.
यंदाच्या राज्य स्पर्धेत मिळविले कांस्यपदक...
राजर्षी शाहू महाविद्यालयाकडून खेळताना यंदाच्या वर्षात वेदिकाने जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत आपल्या संघास कांस्यपदक मिळवून दिले आहे. तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर व बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. विशेषत: २०१९ मध्ये मध्य प्रदेश येेथील छत्तरपूर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. घरची परिस्थिती साधारण, वडील खासगी वाहनावर चालक असून, आई गृहिणी आहे. अशा परिस्थितीत अभ्यास व खेळाचा ताळमेळ राखत तिने हे गणित जुळविले आहे. सकाळी ६ ते ८ मैदानावर, दुपारी १२ ते ५ महाविद्यालय, सायंकाळी ५:३० ते ७ परत खेळासाठी वेळ आणि त्यानंतर सेल्फ स्टडी अशी तिची दिनचर्या होती.
चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे स्वप्न...
यापुढेही शिक्षणासोबत खेळाला वेळ देणार असल्याचे वेदिकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भविष्यात चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे स्वप्न आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच खेळासाठी वेळेचे नियोजन करता आले. त्यामुळेच बारावीत चांगले गुण मिळाले असल्याचे वेदिका दळवे हिने सांगितले.