Video: रेल्वेच्या चाकानजीक आग लागल्याने खळबळ; बंगळुरू एक्स्प्रेसमधील प्रवाशांची तारांबळ
By राजकुमार जोंधळे | Published: March 28, 2023 06:51 PM2023-03-28T18:51:25+5:302023-03-28T18:51:52+5:30
वेळीच आग आटाेक्यात आणल्याने मोठी हानी टळली आहे
उदगीर (जि. लातूर) : येथील रेल्वे स्थानकावर सकाळी ११ वाजता बंगळुरूकडे धावणाऱ्या रेल्वेचे आगमन झाले. दरम्यान, उदगीर रेल्वेस्थानकाच्या फलाटावर थांबलेल्या नांदेड-बंगळुरू एक्सप्रेस रेल्वेच्या चाकानजीक रबराने पेट घेतला. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याचे दिसून आले. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकावरच थांबवून तातडीने डबा रिकामा केला. काही प्रयत्नानंतर आग आटाेक्यात आणल्याने माेठी हानी टळली. यावेळी प्रवाशांसह रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
उदगीर रेल्वे स्थानक प्रबंधक दीपक जोशी म्हणाले, मंगळवारी सकाळी ११.०४ वाजता नांदेडकडून बंगळुरूच्या दिशेने धावणारी एक्स्प्रेस रेल्वे क्रमांक १६५९४ रेल्वे उदगीरच्या रेल्वे स्थानकात दाखल झाली. दरम्यान, (एसटूएसडब्ल्यू २०१८६३ / सी) या क्रमांकाच्या डब्याच्या चाकानजीक असलेल्या रबराला आग लागली. त्यामुळे काही वेळातच मोठ्या प्रमाणावर सर्वत्र धूर पसरला.
लातूर: उदगीर रेल्वेस्थानकाच्या फलाटावर आज सकाळी थांबलेल्या नांदेड-बंगळुरू एक्सप्रेस रेल्वेच्या चाकानजीक रबराने पेट घेतला. वेळीच आग आटाेक्यात आणल्याने मोठी हानी टळली आहे pic.twitter.com/Z1KzH1Cwel
— Lokmat (@lokmat) March 28, 2023
आग लागल्याची घटना उदगीरच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना समजली. त्यांनी तातडीने या डब्यातील सर्व प्रवाशांना खाली उतरविले. डबा पूर्ण रिकामा करून चार अग्निशामक यंत्रांच्या माध्यमातून आग आटाेक्यात आणली. यावेळी रेल्वे स्थानकातील कर्मचारी, रेल्वेच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. तातडीने आग आटाेक्यात आणल्याने मोठी हानी टळली.